Delhi Result : फडणवीसांनी दिल्लीत ज्या उमेदवाराचा आक्रमकपणे प्रचार केला त्याचं काय झालं?

Delhi Result : फडणवीसांनी दिल्लीत ज्या उमेदवाराचा आक्रमकपणे प्रचार केला त्याचं काय झालं?

विधानसभेच्या 70 जागा असलेल्या दिल्लीत भाजप केवळ 7 जागांवर आघाडीवर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं असून आम आदमी पार्टीने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने पक्षाला धक्का बसला आहे. कारण आतापर्यंतच्या कलानुसार विधानसभेच्या 70 जागा असलेल्या दिल्लीत भाजप केवळ 7 जागांवर आघाडीवर आहे.

दिल्लीची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अनेक राज्यांतील मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते भाजपच्या प्रचारासाठी दिल्लीत दाखल झाले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे हे नेतेदेखील पक्षाच्या प्रचारासाठी दिल्लीला गेले होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्याने या नेत्यांची नाचक्की झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या. हरि नगर येथील भाजप उमेदवार तजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत भाजपला मत देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र या निवडणुकीत बग्गा यांचा पराभव झाला आहे.

दरम्यान, दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. त्यानंतर केजरीवालांनी कार्यकर्त्यांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. हा दिल्लीकरांचा विजय असून त्यांनी आपल्या मुलावर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला असं मत त्यांनी व्यक्त केलं. केजरीवाल म्हणाले, हा विकासाचा विजय आहे. आम्ही जी कामं केली त्याला लोकांनी पसंत केलंय. दिल्लीवालो.. गजब कर दिया, I Love You अशी सुरुवातच त्यांनी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांना प्रतिसाद दिला.

First published: February 11, 2020, 4:17 PM IST

ताज्या बातम्या