जगन्नाथपुरी, 27 फेब्रुवारी : ट्राएथलॉन स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर स्पर्धा पूर्ण करताच एकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. ओडिशातील जगन्नाथपुरी जिल्ह्यातील रामचंडी भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
ओडिशातील पुरी जिल्ह्यातील रामचंडी भागात सुरू असलेल्या ट्राएथलॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला. नितीन सोनी (वय 42) असे मृताचे नाव असून, ते जोधपूरच्या सेंट्रल स्कीम रतनदा येथील रहिवासी आहेत. त्यांनी ट्राएथलॉन स्पर्धेत बंगालच्या उपसागरात 3.8 किलोमीटर पोहल्यानंतर 42 किलोमीटर धावणं, आणि त्यानंतर 180 किलोमीटर सायकल चालवली होती.
निवृत्तीनंतर व्यवसाय
ट्राएथलॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नितीन सोनी गेले होते. पण दुर्दैवानं ही स्पर्धा त्यांची शेवटची स्पर्धा ठरली. कारण स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं, व थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सोनी यांचे वडील डॉ. एन. डी. सोनी यांनी सांगितलं की, ‘नितीन विवाहित असून, त्यांना दोन मुलं आहेत.’ नितीनचे वडील जयपूरमध्ये राहतात आणि ते बाडमेर मेडिकल कॉलेजचे प्राचार्य होते. नितीन यांनी लष्करात कॅप्टन म्हणून काम केलं होतं. ते 2007 साली निवृत्त झाले. तेव्हापासून त्यांनी खासगी व्यवसाय सुरू केला होता.
छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये नेलं
ट्राएथलॉन स्पर्धेत सहभागी झालेले माजी सैनिक नितीन सोनी यांच्या छातीमध्ये स्पर्धा संपताच अचानक दुखू लागलं. यानंतर त्यांना प्रथम कोणार्क हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. येथून पुरी मेडिकल हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पुरी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याबाबत पुरी येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन यांच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं आहे. त्यांचा मृतदेह घेण्यासाठी मृताचा मोठा भाऊ जोधपूरहून आला होता. त्याच्याकडे नितीन यांचा मृतदेह सोपवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, आजकाल अनेकांना कामाच्या व्यापात धावपळ करावी लागते. अशावेळी बऱ्याचदा इच्छा अ्सूनही स्वतःच्या शरीराकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून लक्ष देणं शक्य होत नाही. अनेकदा झोपण्याची वेळ, जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाही. या सर्वांचा आरोग्यावर दृष्परिणाम होतो. त्यामुळे आजकाल अकाली मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Odisha