नवी दिल्ली, 11 मे : मध्य प्रदेशात इंदूरमध्ये एका संशयित गुन्हेगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. चोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या या दलित तरुणावर अमानुष अत्याचार तक्रार आल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी या प्रकरणी CBI चौकशी व्हावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री गेहलोत यांनी म्हटलंय, "या प्रकरणी पोलिसांनी क्रूरतेची सीमा ओलांडली. दलित तरुणाची नखं उपटण्यात आली. हातोड्याने पायावर मारून पाय तोडले गेले आणि नंतर इलेक्ट्रिक शॉकही देण्यात आले. त्यानंतर तो तरुण बेशुद्ध झाला. शुद्धीवर यावं म्हणून पोलिसांनी त्याच्या तोंडावर पाणी ओतलं. शुद्धीवर येताच पुन्हा त्याला मारहाण सुरू केली. त्याला प्यायला पाणीदेखील दिलं गेलं नाही. तीन तास तो तरुण हा छळ सहन करत होता आणि यातच त्याचा मृत्यू झाला."
संजू टिपणिया या 22 वर्षांच्या तरुणाला इंदूरच्या गांधी नगर पोलीस ठाण्यात मारहाण झाली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. यासंदर्भात कमलनाथ यांना पत्र लिहिताना
या दलित तरुणाच्या आईलाही पोलीस स्टेशनला बोलावून घेण्यात आलं आणि तिलाही मारहाण करण्यात आली. त्यात तिच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालं, असा आरोप गेहलोत यांनी या पत्रात केला आहे.
या दलित तरुणाच्या भावालाही गावकऱ्यांसमोर मारहाण करण्यात आली. त्यात तो जखमी झाला. या कुटुंहबाला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे, असं सामाजिक न्यायमंत्र्यांनी म्हटलं आहे. "या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तुम्ही याची CBI चौकशी करण्याचे आदेश द्याल, अशी आशा आहे."
या दलित तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे की, गांधी नगर पोलीस ठाण्यातले चार कॉन्स्टेबल आणि स्टेशन इन चार्ज नीता देयारवाल यांना निलंबित करण्यात आलं आहे.