...म्हणून भारताच्या हवामान खात्याचं UN ने केलं कौतुक

पावसाच्या बाबतीत अंदाज नेहमी चुकतो, म्हणून ट्रोल होणारं हवामान खातं या वेळी मात्र जागतिक पातळीवर कौतुकाचा विषय झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 4, 2019 03:39 PM IST

...म्हणून भारताच्या हवामान खात्याचं UN ने केलं कौतुक

संयुक्त राष्ट्र, 4 मे : मान्सूनचा अंदाज व्यक्त केल्यानंतर प्रत्यक्षात नेहमीच वेगळं होतं म्हणून ट्रोल होणाऱ्या भारतीय हवामान खात्याचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मात्र कौतुक झालंय. फानी चक्रीवादळासंदर्भात अगदी तंतोतंत बरोबर अंदाज वर्तवल्याबद्दल भारतीय हवामान खात्याचा UN ने गौरव केला आहे. हवामानाचा अंदाज आणि वेळेत आणि बरोबर वर्तवल्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले, असं राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.

भारतीय वेधशाळा आणि हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाज नेहमीच कसे चुकतात यावर सोशल मीडियावरसुद्धा विनोद फिरतात. पाऊस पडणार सांगितल्यावर तो गायब होतो, असा खात्याचा अंदाज असतो, असं टीकाकार म्हणतात. मात्र फानी चक्रीवादळाचा अगदी अचूक अंदाज हवामान खात्याने वर्तवला

फानी चक्रीवादळ जमिनीवर नेमकं कुठे धडकणार, किती वाजता धडकणार, त्याची तीव्रता काय असणार, दिशा काय असणार याचा अगदी बरोबर अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुले सुमारे 10 लाख लोकांना वेळेत सुरक्षित स्थानी हलवण्यात आलं. रेल्वे आणि विमान सेवांनी या अंदाजानुसार आपल्या वेळापत्रकात बदल केले आणि ठरावीक वाहतूक सेवा बंद केली. त्यामुळे प्रवासी अडकून पडण्याच्या घटना फारशा घडल्या नाहीत आणि मोठे अपघातही वाचले.


VIDEO: भयंकर! उभी असलेली बसही वाऱ्याच्या वेगानं दूर फेकली, 'फानी'चा तडाखा

Loading...


VIDEO: 'फानी'चा फुत्कार, चक्रीवादळाच्या तडाख्याचा पुरीतून ग्राऊंड रिपोर्ट


गेल्या 20 वर्षांतलं सर्वात मोठं चक्रीवादळ 3 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास ओदिशाच्या किनाऱ्याला धडकलं. पुरीपासून जवळच या वादळाचा केंद्रबिंदू होता. पुरी हे देशी - विदेशी पर्यटकांसाठी आणि भक्तांसाठी आकर्षणाचं स्थळ आहे. पुरीमध्ये होणारं नुकसान आधीच वर्तवलं गेल्यामुळे पर्यटकांना इथून वेळीच बाहेर काढण्यात आलं आणि मोठी जीवितहानी टळली. पर्यटकांना होणारा मनस्तापही खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला, असं राष्ट्रसंघाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

झीरो कॅज्युल्टी सायक्लॉन प्रेडिक्शन पॉलिसी अर्थात जीवितहानी पूर्ण टाळणारा हवामानाचा अंदाज याबद्दल 2015 मध्ये एक आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार भारताने वेळेवर आणि सुयोग्य पद्धतीने उपाययोजना आखत या वादळामुळे होणारी हानी कमी करण्यात यश मिळवलं.

प्राथमिक अंदाजानुसार फानीच्या तडाख्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळाचा अतितीव्र चक्रीवादळ म्हणून अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 2 कोटी 80  लाख लोक वादळाच्या तडाख्यात येण्याचा अंदाज होता. यामध्ये 1 कोटी लहान मुलांचा समावेश होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2019 03:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...