Home /News /national /

वर्षातलं पहिलं चक्रीवादळ 'असनी' अंदमान निकोबारमध्ये येऊन धडकलं, पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे

वर्षातलं पहिलं चक्रीवादळ 'असनी' अंदमान निकोबारमध्ये येऊन धडकलं, पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे

हवामान खात्यानं मच्छिमारांना 22 मार्चपर्यंत बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेट तसेच बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य आणि उत्तर-पूर्व भागात जाऊ नये, असा इशारा दिला आहे. प्रशासनानं 22 मार्चपर्यंत या भागातील सर्व पर्यटनावर, समुद्री मार्गावरील वाहतुकीवर बंदी घातली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 20 मार्च : 2022 मधलं पहिलं चक्रीवादळ 'असनी' (Asani cyclone) रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर (Andaman Nicobar) धडकलं. किनारी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. येत्या 24 तासांत त्याची तीव्रता आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर आवश्यक व्यवस्था करण्यात गुंतले आहे. किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. एका बेटातून दुसऱ्या बेटावर जाणारी जहाजं थांबवण्यात आली आहेत. चेन्नई आणि विशाखापट्टणम दरम्यानची शिपिंग सेवाही बंद करण्यात आली आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department – IMD) ने माहिती दिली आहे की दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पूर्व आणि ईशान्येकडं सरकलं आहे. रविवारी ते आणखी खोल होण्याची शक्यता आहे. सोमवारी ते चक्री वादळाचं रूप धारण करू शकतं. हवामान खात्यानं ट्विटरवर सांगितले की, रविवारी अंदमान बेटांवर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांसाठी अलर्ट जारी हवामान खात्यानं मच्छिमारांना 22 मार्चपर्यंत बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेट तसेच बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य आणि उत्तर-पूर्व भागात जाऊ नये, असा इशारा दिला आहे. वादळाचा प्रभाव पाहता अंदमान आणि निकोबारचे मुख्य सचिव जितेंद्र नारायण यांनी 22 मार्चपर्यंत या भागातील सर्व पर्यटन उपक्रमांवर बंदी घातली आहे. पोर्ट ब्लेअरहून आसपासच्या बेटांवर समुद्रमार्गे जाणारी सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील 24 तास धोक्याचे अंदमानमधील हवामान बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय तटरक्षक दलाने मोर्चेबांधणी केली आहे. मच्छीमारांना समुद्रातून बाहेर काढले जात आहे. मदत आणि बचावाच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. अंदमान आणि निकोबार प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक 03192-245555/232714 आणि टोल फ्री क्रमांक 1800-345-2714 प्रसारित केला आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Cyclone, IMD FORECAST, Weather warnings

    पुढील बातम्या