श्रीनगर 16 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी धडक मोहिम सुरू केली आहे. यात दहशतवाद्यांच्या अनेक म्होरक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश मिळालं आहे. शुक्रवारी सुरक्षा दलांनी केलेल्या मोठ्या कारवाईत लष्कर ए तोयबाची लपण्याची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा दलांना यश मिळालं.
राष्ट्रीय रायफल्स आणि CRPFने केलेल्या संयुक्त कारवाईत लष्कर ए तोयबाचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात करण्यात आला. दहशतवाद्यांना लपण्यासाठी भूमिगत बंकर्स तयार करण्यात आले होते. या कारवाईमध्ये शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळालं आहे. अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, चीनच्या कुरघोड्या सुरूच असताना आता पाकिस्तानातून 250 दहशतवादी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. काश्मीर सीमेवर हे पाकिस्तान सध्या लक्ष ठेवत असून त्यांना चीनची मदतही मिळत आहे.
चिनी सैन्य भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच पाकिस्ताननं सुरू केलेलं नवं कारस्थान भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याआधीच चीन आणि पाकिस्तान मिळून कारस्थान रचत असल्याचे सांगितले होते. याआधी 10 ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्न लष्करानं उधळून लावला होता.
मेजर जनरल अमरदीपसिंह औजल यांनी सांगितले की, उन्हाळ्यात सीमेपलीकडून घुसखोरीचे जितके प्रयत्न होत आहे, तितकेच हिवाळ्यातही झाले. मात्र सर्व प्रयत्न लष्करानं उधळून लावले.
चीन किंवा पाकिस्तानशी युद्ध झालं तर लष्कर आणि वायुसेनाच महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे भारताने BR प्लॅन तयार केला आहे. B म्हणजे भीष्म रणगाडा आणि R म्हणजे राफेल फायटर जेट विमान. लडाखमध्ये 15 ते 17 हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने भीष्म रणगाडे तैनात केले आहेत.
J&K: Awantipora Police, with 55 Rashtriya Rifles & 185 Battalion CRPF, launched a search operation today and busted & destroyed an underground hideout of Lashkar- e-Taiba. Incriminating material, explosive material and ammunition - including 2091 AK-47 - recovered. FIR registered pic.twitter.com/DHEo4NHupx
— ANI (@ANI) October 16, 2020
चीनच्या T-63 या T-99 रणगाड्यांपेक्षा भारताचे रणगाडे जबरदस्त शक्तिशाली असल्याचंही सैन्यानं सांगितलं आहे. त्यामुळे जर चीननी युद्ध केलं तर त्यांनाच जोरदार चपराक बसेल हे भारताच्या शस्रसिद्धतेमुळे स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे या प्लॅनच्या R भागासाठी भारतीय वायुसेना राफेल फायटर जेट विमानांसह सज्ज आहे. त्यामुळे पाकिस्तान घाबरला असून त्यांचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारतानी राफेल आणल्यावरच त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली होती.