पटणा, 7 नोव्हेंबर : बिहार निवडणुकीचं (Bihar Poll)च्या शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्याचं मतदान संध्याकाळी 6 वाजता संपल्यानंतर आता सगळेच एक्झिट पोल (Bihar Exit Poll) यायला सुरुवात झाली आहे. यातल्या बहुतेक एक्झिट पोलमध्ये एनडीए (NDA) आणि युपीए (UPA) यांच्यात 'कांटे की टक्कर' होताना दिसत असली तरी युपीए थोड्याश्या फरकाने आघाडीवर आहे. या एक्झिट पोलनुसारच बिहारचे निकाल लागले, तर राष्ट्रीय जनता दल (RJD)चे तेजस्वी यादव यांचा बिहारचे मुख्यमंत्री व्हायचा मार्ग मोकळा होईल. 30 वर्षांचे तेजस्वी यादव हे सध्या बिहारचे विरोधी पक्षनेते आहेत. भारतातले सगळ्यात तरुण विरोधी पक्षनेते होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.
लालूप्रसाद यादव यांचे पूत्र असलेले तेजस्वी यादव यांचा राजकारणातला प्रवास तसा रंजक आहे. राजकारणामध्ये प्रवेश मिळवण्याआधी तेजस्वी यादव यांनी क्रिकेटमध्येही त्यांचं नशीब आजमावलं होतं. आयपीएल (IPL)मध्ये तेजस्वी यादव दिल्ली डेयरडेव्हिल्स (Delhi Daredevils) टीमसोबत होते. 2009 ते 2012 या कालावधीमध्ये दिल्लीच्या टीमसोबत असूनही त्यांना एकदाही खेळायची संधी मिळाली नाही.
राष्ट्रीय स्तरावर अंडर-19 क्रिकेट खेळल्यानंतर तेजस्वी यादव यांच्यासोबत दिल्लीच्या टीमने 2009 साली करार केला. त्यावेळी लालूप्रसाद यादव देशाचे रेल्वेमंत्री होते. 2009 ते 2012 या कालावधीमध्ये बेंचवर बसून राहिलेल्या तेजस्वी यादव यांना दिल्लीच्या टीमने 30-40 लाख रुपये दिल्याचं सांगितलं जातं.
2010 साली तेजस्वी यादव यांनी बिहारच्या निवडणुकीत वडिल लालूप्रसाद यादव यांच्यासाठी प्रचाराला सुरुवात केली. दोन वर्षानंतर संसदेमध्ये बोलताना लालूप्रसाद यादव म्हणाले, 'माझा मुलगा दिल्लीच्या टीममध्ये आहे, पण त्याने आतापर्यंत फक्त मैदानात पाणी नेण्याचं काम केलं आहे. त्यांनी तेजस्वीला खेळण्याची संधी दिली नाही.'
स्थानिक क्रिकेटमध्ये तेजस्वी यादव यांनी 7 मॅचमध्ये 37 रन केल्या, तसंच त्यांना फक्त 1 विकेट घेण्यात यश आलं. 2009 साली झारखंडसाठी प्रथम श्रेणी मॅच खेळताना तेजस्वी सातव्या क्रमांकावर बटिंगला उतरले. पहिल्या इनिंगमध्ये त्यांना 1 रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 19 रन करता आले, त्यामुळे त्यांची सरासरी 10 एवढी राहिली. तर या मॅमध्ये त्यांनी 5 ओव्हर टाकल्या, पण त्यांना एकही विकेट मिळाली नाही.
2010 साली विजय हजारे ट्रॉफीमध्ये तेजस्वी यादव झारखंडकडून लिस्ट ए (मर्यादित ओव्हर) च्या 2 मॅच ऑलराऊंडर म्हणून खेळले. ओडिसाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये झारखंडचा पराभव झाला, या मॅचमध्ये तेजस्वीना 9 रन करता आल्या, तर त्रिपुराविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी 1 विकेट घेतली आणि 5 रनही केल्या. या मॅचमध्ये झारखंडला विजय मिळवला होता.
सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतही तेजस्वी यादव खेळले होते. टी-20 मध्ये तेजस्वी यादवना 4 मॅचमध्ये फक्त एकाच मॅचमध्ये बॅटिंग मिळाली होती. या एका मॅचमध्ये त्यांनी 3 रन केल्या होत्या. तर चारही मॅचमध्ये बॉलिंग केल्यानंतरही त्यांना एकही विकेट मिळाली नव्हती.
7 मॅचमध्ये 37 रन करुन आणि 1 विकेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांची क्रिकेट कारकिर्द संपली आणि त्यांनी मोर्चा राजकारणाकडे वळवला. योगायोग म्हणजे ज्या दिवशी आयपीएलची फायनल आहे, त्याच दिवशी बिहार निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.