जबलपूर, 9 जून: कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी संपूर्ण देशभरात वेगाने लसीकरण मोहिम (Vaccination drive) सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना औषधांचा काळाबाजार होत असल्याचं उघड झालं होतं. मात्र, आता तर चक्क कोविड प्रतिबंधक लसींचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कारण, जबलपूर (Jabalpur) येथील एका रुग्णालयाने सीरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute) कोविशिल्ड लसींच्या 10 हजार डोसची ऑर्डर (Covishield vaccine) दिली. मात्र, तपासणीत असे समोर आले की, ज्या रुग्णालयाने ऑर्डर दिली ते रुग्णालयच अस्तित्वात नाहीये.
मध्यप्रदेशातील जबलपूर आरोग्य विभाग गेल्या काही दिवसांपासून एका रुग्णालयाचा शोध घेत आहेत. या रुग्णालयाने सीरम इन्स्टिट्यूटला कोविशिल्ड लसींच्या 10 हजार डोसची ऑर्डर दिली होती. मात्र, आरोग्य विभागाच्या मते हे रुग्णालयच नाहीये. 25 मे रोजी मध्यप्रदेशातील एकूण 6 खासगी रुग्णालयांनी कोविशिल़्ड लसीची ऑर्डर सीरमला दिली होती. या संदर्भातील वृत्त टीव्ही9 पोर्टलने दिलं आहे.
वृत्तानुसार, एका व्यक्तीने कोविशिल्ड लसीच्या 10 हजार डोसची ऑर्डर सीरमला दिली. त्यावेळी जबलपूर येथील मॅक्स हेल्थ केअर नावाने ही ऑर्डर बूक करण्यात आली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात लसींची ऑर्डर दिली गेल्याने भोपाळ येथून जबलपूरच्या आरोग्य विभागाकडे लसींच्या साठवणूकीची क्षमता तपासण्याची माहिती देण्यात आली.
या आदेशानंतर जबलपूर येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी मॅक्स हेल्थ केअर हॉस्पिटलची माहिती घेण्यास सुरुवात केली. मात्र, या नावाचे रुग्णालयच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. या लसींचा काळाबाजार होणार होता का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तसेच यामागे बनावट इंजेक्शन विक्री करणारी टोळी तर नाहीये ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Madhya pradesh