तिरुअनंतरपुरम, 13 डिसेंबर : कोरोनाची लस अंतिम टप्प्यात असून लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. ही लस प्रत्येकापर्यंत पोहोचावी यासाठी सरकारकडून मोठा प्लॅन सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोना लशीबाबत एका राज्यात मोफत लस देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. भारतात फार्मा कंपनीच्या कोणत्याही लस वापरण्यासाठी मंजूर झालेली नसली तरी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आवश्यक तयारी पूर्ण करण्यास सांगितले आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळसह अनेक राज्यात तयारी अंतिम टप्प्यात आहे. लस साठवून ठेवण्यापासून ते लसीकरण प्राधान्य देण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. त्याचबरोबर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. राज्यातील लोकांना कोरोना विषाणूची लस विनाशुल्क दिली जाईल, असे सांगत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी मोठी घोषणा केली. विजयन यांनी लोकांना हा आजार पसरू नये म्हणून अत्यधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, खबरदारी घेतली नाही तर राज्याची अवस्था आणखी बिकट होईल.
हे वाचा-स्मार्टफोन चार्ज करताना तुम्हीही या चुका करता का? होऊ शकतं मोठं नुकसान
अमेरिकेच्या फार्म सेक्टर फायझर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने कोविड -19 ची लस 'कोवॅक्सिन' या देशातील विकसित लसीच्या आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयकडे मान्यता मागितली आहे. कोरोना लस वितरणासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर लगेचच त्याच दिवशीच विनामूल्य कोरोना लस देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्रात आणि अत्यावश्यक सेवा आणि कोरोना योद्ध्यांना ही लस उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारची योजना सुरू आहे. तर हरियाणामध्ये जनप्रतिनिधींना ही लस मोफत देण्याबाबत सरकार योजना तयार करत आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 6 ते 7 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे.
देशभरात कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढत असला तरी नव्यानं लागण होणाऱ्यांची संख्या अजूनही म्हणावी तेवढी नियंत्रणात आली नाही. दर दिवसाला 30 ते 40 हजाराच्या आसपास नवीन रुग्ण आढळून येत आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर वापरण्यातं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे.