भारतानं ओलांडला 10 लाखांचा टप्पा, 20 दिवसांत 5 लाख नवीन कोरोनाचे रुग्ण

भारतानं ओलांडला 10 लाखांचा टप्पा, 20 दिवसांत 5 लाख नवीन कोरोनाचे रुग्ण

भारत आता ब्राझील आणि अमेरिकेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जुलै: चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं भारतात आतापर्यंत 10 लाखाचा टप्पा पार केल्यानं चिंता वाढली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करूनही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे. सरकारकडून सातत्यानं रिकव्हरी रेटबाबत चर्चा होत असली तरी एकूण आकडेवारीचा विचार केला तर चिंताजनक आहे. जुलै महिन्यात कोरोना विषाणूचा वेग सर्वात चिंताजनक आहे. या महिन्याच्या अवघ्या 16 दिवसांत देशात 4.15 लाख नवीन कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत. जुलैमध्ये दररोज 500-600 मृत्यूची नोंद होत आहे.

भारत जगभरात असा तिसरा देश जिथे कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाखावर पोहोचली आहे. अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारताचा क्रमांक लागतो. अमेरिकेत 37 लाखहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत तर ब्राझिलमध्ये 20 लाख. कोरोनाचं संक्रमण आणि संसर्ग किती वेगानं वाढतोय याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात केवळ 6 दिवसांमध्ये 2 लाखहून अधिक रुग्ण वाढले आहेत. अमेरिका आणि ब्राझिलच्या तुलनेत हा संसर्ग पसरण्याचा वेग भारतात जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचा-मुंबईत नव्हे, कल्याण-डोंबिवली, ठाण्यात वाढतोय Corona; रुग्णवाढीचे धक्कादायक आकडे

भारतात पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण 30 जानेवारी रोजी केरळमध्ये आढळला होता. त्यानंतर एक लाख कोरोनाग्रस्तांचा आकडा होण्यासाठी जवळपास 110 दिवस लागले होते. त्यानंतर पुढच्या 14 दिवसांमध्ये एक लाखवरून दोन लाखांवर वेग पोहोचला. 149 दिवसांनी म्हणजेच 26 जून रोजी देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 लाखहून अधिक पोहोचली होती.

27 जून ते 17 जुलै या कालावधीमध्ये उर्वरित 5 लाख नवीन प्रकरण समोर आली आहेत. कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरत असल्याची माहिती समोर आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ 20 दिवसांमध्ये आणखीन 5 लाख लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. आज कोरोनाग्रस्तांचा आकाडा 10 लाखांवर पोहोचला आहे.

वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी कोरोनाच्या 35 हजार नवीन केसेस समोर आल्या आहेत. एका दिवसात भारतात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं नवीन रुग्ण आढळल्यानं काहीशी भीती व्यक्त केली जात आहे. भारत आता ब्राझील आणि अमेरिकेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेत दरदिवशी साधारण 60 तर ब्राझिलमध्ये सरासरी 40 हजार नवीन कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत त्यानंतर भारताचा क्रमांक लागत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 17, 2020, 8:18 AM IST

ताज्या बातम्या