नवी दिल्ली, 27 जानेवारी : राज्यांमध्ये उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी एक महत्वाची योजना केंद्राने तयार केली होती. यामध्ये राष्ट्रीय उच्च शिक्षण मोहिम (रुसा)यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. टॅक्सी भाडे तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखवण्यात आलं आहे. याचा उलगडा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने इंटरनल ऑ़डिटमध्ये केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ऑडिटमध्ये 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चात अनियमितता आढळून आली आहे. यात देशासह परदेशात कार्यक्रम आयोजन करण्यासाठी अॅडव्हान्स रक्कम काढण्यात आल्याचं म्हटलं आहे.
भ्रष्टाचाराचा हा प्रकार कसा केला याचा धक्कादायक खुलासा ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. खर्चाचा ताळमेळ लावण्यासाठी तब्बल 1.26 कोटी रुपयांचे टॅक्सी भाडे दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या भाड्याच्या पावत्या हाताने लिहिलेल्या होत्या. ऑडिटमध्ये 23 लाख रुपये एका अधिकाऱ्याने त्याच्या मुलांच्या खाजगी परदेश दौऱ्यासाठी खर्च केल्याचाही खुलासा केला आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेसाठी काढण्यात आलेली रक्कम आणि मंत्रालयाला देण्यात आलेली बिले यामध्ये ताळमेळ लागत नसल्याचं ऑडिटमध्ये समोर आलं आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने ऑक्टोंबर 2013 मध्ये रूसा ही योजना सुरू केली होती. राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात कऱण्यात आली होती.
ममतांचा पीएम मोदींवर पलटवार, CAA विरोधात पश्चिम बंगालच्या विधानसभेत ठराव मंजूर!