मुंबई, 02 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरस संक्रमण दिवसेंदिवस वेगानं वाढत आहे. ह्या वाढत्या प्रादूर्भावाला निजामुद्दीन तबलीगी जमातीची दिल्लीत झालेली परिषदही काही अंशी जबाबदार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. परिषदेतील जवळपास 8 हजारहून अधिक लोक 22 राज्यांमधील वेगवेगळ्या भागांत गेले होते. त्यापैकी 6 हजार लोकांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. बुधवारी संध्याकाळी 437 नवीन नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 1900 झाली असून आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे.
यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तीन राज्यांमध्ये 24 तासांत मोठ्या प्रमाणात नवीन केसेस समोर आल्या आहेत. दिल्लीत 53 नवीन जण पॉझिटिव्ह आढळल्यानं इथली संख्या 152 तर महाराष्ट्रात 33 नव्या केसेस आढळल्यानं 335 वर संख्या पोहोचली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईतूनच 30 नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. मुंबईत तब्बल 5000 जण क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यातच आता सर्वाधिक कोरोना पसरले अशी भीती असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने लोकांमध्ये भीती आहे. 24 तासांत मुंबईत कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
हे वाचा-मुंबईत खाक वर्दीत 'देव'दर्शन, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून कॉन्स्टेबलच कौतुकतमिळनाडूमध्ये 110 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
दिल्लीतील तबलीगी जमातमध्ये हजेरी लावल्यानंतर तामिळनाडूला परत आलेल्या 110 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. राज्यात आतापर्यंत 244 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तामिळनाडूमध्ये निजामुद्दीनच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 515 जणांची ओळख पटली आहे, तर त्यापैकी 59 जणांना वेगळं ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री के. पलानीसामी म्हणाले की या कार्यक्रमात राज्यातील सुमारे 1500 लोक सहभागी झाले होते, त्यापैकी 1,131 लोक राज्यात परत आले आहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की निझामुद्दीन (पश्चिम) च्या तबलीगी-ए-जमातचे मरकज पूर्णपणे रिकामं केलं आहे. जवळपास ही इमारत रिकामी करण्यासाठी 36 तास लागले. त्यातून 2, 361 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी युद्धपातळीवर सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
देशातील आणि महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचे आकडे हे चिंता निर्माण करणारे आहेत. दिवसेंदिवस या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत फक्त 144 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. पण मुंबईसह अनेक मेट्रो शहरांमध्ये मात्र अजूनही कोरोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि घरातून विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हे वाचा-धारावीतील 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू, मुंबईत आज 6 जणं दगावले
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.