Google इंजिनिअरच्या बायकोलाही कोरोना; नवऱ्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावरही केला विमान आणि ट्रेन प्रवास

Google इंजिनिअरच्या बायकोलाही कोरोना; नवऱ्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावरही केला विमान आणि ट्रेन प्रवास

कमाल म्हणजे, नवऱ्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिलाही घरातून बाहेर न पडण्याचा (Home Quarantine)सल्ला देण्यात आला होता. पण प्रशासनाला कुठलाही पत्ता लागू न देता ती बंगळुरू सोडून पसार झाली आणि आग्र्याला पोहोचली.

  • Share this:

आग्रा, 14 मार्च : दोन दिवसांपूर्वी बंगळुरूच्या Google ऑफिसमधल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आली होती. त्याच्या बायकोची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. हे नवरा-बायको इटलीला हनिमूनसाठी गेले होते. कमाल म्हणजे, नवऱ्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिलाही घरातून बाहेर न पडण्याचा (Home Quarantine)सल्ला देण्यात आला होता. पण प्रशासनाला कुठलाही पत्ता लागू न देता ती बंगळुरू सोडून पसार झाली. एवढंच नाही तर तिने बंगळुरूहून दिल्लीला जाण्यासाठी विमान प्रवास केला आणि वर दिल्लीहून आग्र्याला ट्रेनने गेली. आपल्या पालकांबरोबर राहाता यावं यासाठी तिने हा प्रवास केल्याचं सांगितलं जातं. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकल टीम तिच्या पालकांच्या घरी तिच्या शोधार्थ पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांनी ती बंगळुरूला निघून गेल्याचं खोटंच सांगितल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दोघेही इटलीहून परतल्यानंतर नवऱ्याला कोरोनाची लक्षणं दिसल्यामुळे चाचणी केली गेली. बायकोलाही क्वारंटाइन करण्यात आलं. पण तिने न सांगताच आग्र्यापर्यंत प्रवास केला. आता तिचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने विमान प्रवासादरम्यान आणि ट्रेनप्रवासादरम्यान या महिलेमुळे सहप्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाचा - कोरोना प्रभावित देशातून आलेले 335 प्रवासी बेपत्ता, तपासणी न केल्याने धोका वाढला

फेब्रुवारीत बंगळुरूमध्ये या दोघांचं लग्न झाल्यानंतर ते हनीमूनला गेले. इटली, फ्रान्स आणि ग्रीस असा प्रवास करन 28 फेब्रुवारीला मुंबई विमानतळावर उतरले. तिथून बंगळुरूला विमानाने पोहोचले. 7 मार्चला गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या नवऱ्याची कोरोना व्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आली. आरोग्य अधिकाऱ्यांनी नवरा-बायको दोघांनाही विलगीकरणात राहायला सांगितलं. पण आपल्या परिस्थितीबद्दल या महिलेने तिच्या आग्रा इथे राहणाऱ्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तिला आग्र्याला परतण्याचा सल्ला दिला आणि आग्रह धरला. ती 8 मार्चला बंगळुरूहून आग्र्याला गेली. बंगळुरूच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती तिने दिली नाही. संशयित रुग्ण गायब झाल्याने आग्र्याचे वैद्यकीय पथक तिच्या घरी चौकशीसाठी गेले असता, वडिलांनी ती परत बंगळुरूला रवाना झाल्याचं खोटंच सांगितलं.

संबंधित 'कोरोना'वर मात केलेल्या रुग्णाला पुन्हा व्हायरसची लागण होऊ शकते का?

ही महिला आग्र्याला 8 नातेवाईकांसह राहिली. त्यात काही ज्येष्ठ नागरिकही आहेत. अखेर आरोग्य अधिकाऱ्यांनी नियम आणि कायदा सांगितल्यानंतर तिला क्वारंटाइन करण्यात आलं. तिच्या घरच्यांची आता तपासणी करण्यात येत आहे आणि त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं आहे. पण तिने केलेल्या बंगळुरू ते आग्रा प्रवासादरम्यान तिच्या संपर्कात किती लोक आले आणि त्यातून कुणाला संसर्ग झाला, हे शोधणं आता प्रचंड अवघड काम झालं आहे.

अन्य बातम्या

First published: March 14, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading