अहमदाबादमध्ये उद्यापासून कर्फ्यू; महाराष्ट्रातही लागू होणार का पुन्हा Lockdown?

Covid रुग्ण वाढू लागल्याने शुक्रवारपासून अहमदाबाद शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे.

Covid रुग्ण वाढू लागल्याने शुक्रवारपासून अहमदाबाद शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे.

  • Share this:
    मुंंबई, 19 नोव्हेंबर:  Coronavirus च्या नव्या रुग्णांचा आलेख गेले काही दिवस महाराष्ट्रात सातत्याने घसरत होता. त्यामुळे दिलासा मिळत असतानाच गेल्या दोन दिवसात चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. Covid-19 चे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला लागले आहेत. कोरोना मृत्यूंची संख्याही वाढते आहे. त्यामुळे शेजारच्या गुजरात राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा कर्फ्यू लागू केला, तसा महाराष्ट्रातही करणार का याची चर्चा सुरू झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गुजरातमधल्या अहमदाबाद (Ahmadabad city) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. महाराष्ट्रातही दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एका लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने पुन्हा लॉकडाऊन लावण्यासंदर्भातली कुठलीही घोषणा केलेली नाही किंवा तसे संकेतही दिलेले नाहीत. उलट महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. पण दिवाळीपूर्वीच्या गर्दीमुळे शहरात वाढलेला कोरोनाचा धोका कसा हाताळायचा याबाबत काही माहिती सरकारने दिलेली नाही. गुरुवारी (19 नोव्हेंबर) सलग दुसऱ्या दिवशीही नव्या रुग्णांची संख्या 5000 वर गेली आहे. दिवसभरात 5,535 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 5,860 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 154 जणांचा मृत्यू झाला.  पुण्यात 21 दिवसांनंतर बुधवारी कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उंच झाला. 21 दिवस सातत्याने कमी होणारी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. गुरुवारीसुद्धा पुण्यात नव्याने दाखल झालेले कोरोना रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आणि चाचण्यांमुळे नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा एकदा पसरणार का असा धोका निर्माण झाला आहे.  महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 17 लाख 3 हजार 055 वर गेली आहे. त्यातल्या एकूण 16 लाख 35 हजार 971 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 46,356 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अहमदाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं लक्षात आल्यावर रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदाबादमध्ये कोरोनाचा(Covid-19) मुकाबला करण्यासाठी 300 डॉक्टर्स आणि मेडिकलच्या 300 विद्यार्थ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्याच बरोबर 20 रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरातल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधले बेड्स वाढविण्यात आले आहेत. शहरात सध्या 2600 बेड्स खाली आहेत. लोकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पुढच्या आदेशापर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे. अहमदाबाद हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं. दिवाळीची गर्दी ओसरल्यानंतर आता रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: