Home /News /national /

सरकारने सोडलेल्या 200 विशेष रेल्वे गाड्या महाराष्ट्रातील स्थानकांवर थांबणार, पण...

सरकारने सोडलेल्या 200 विशेष रेल्वे गाड्या महाराष्ट्रातील स्थानकांवर थांबणार, पण...

रेल्वेनं 200 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अनेकांनी महाराष्ट्रातल्या आपल्या घरी जाण्यासाठी बुकिंग केलं.

मुंबई, 22 मे : तुमच्या दारावरून गाडी जाते पण तुम्हाला उतरता येत नाही, असं झालं तर कोणालाही दुःख वाटेल. पण आता तसं होणार आहे. कारण रेल्वेनं 200 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अनेकांनी महाराष्ट्रातल्या आपल्या घरी जाण्यासाठी बुकिंग केलं. पण रेल्वेने मात्र त्यानंतर एका पत्रकाद्वारे स्पष्ट केलं की, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तुम्हाला प्रवास करता येणार नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजे मुंबईतून गाडी निघाली तर तुम्हाला पुण्याला उतरता येणार नाही. गाडी पुण्याला थांबेल, पण पुण्यावरून अनेक लोक इतर राज्यात जाण्यासाठी जाऊ शकतील. पण तुम्हाला मात्र तुमच्या घरी उतरता येणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने रेल्वेला याबाबत सूचित केलं होतं की महाराष्ट्रामधील कोरोनाबाधितांची संख्या पाहता आंतरजिल्हा वाहतूक किंवा आंतरजिल्हा प्रवास हा पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये रेल्वेने आंतरजिल्हा वाहतूक होऊन होणार नाही याची काळजी घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात ट्रेनने प्रवास करण्याचा जो ऑप्शन होता तोच रेल्वेने बंद केलेला आहे. तसंच ज्यांनी याआधी तिकीट बुक केलेलं आहे त्यांना कोणत्याही प्रकारचे चार्जेस न घेता म्हणजे बुकिंग किंवा कॅन्सलेशन अशा प्रकारचे कोणतेही चार्जेस किंवा त्याचे पैसे न लावता पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. या विशेष ट्रेन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रवासियांच्या मनात एक आशा निर्माण झाली होती की वाट न पाहता त्यांना आपल्या घरी जाता येणार आहे. तिकीट बुक झालं, रेल्वे स्टेशनला पोहोचायचे आणि काही तासांतच घरी जायचे. पण आता मात्र याचा लाभ घेता येणार नाही. दरम्यान, लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागांत अडकून पडलेल्या श्रमिकांची वणवण काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. कधी भरदिवसा तळपत्या उन्हात, तर कधी मध्यरात्री मिळेल त्या मार्गाने आणि मिळेल त्या वाहनाने आपले घर गाठण्यासाठी श्रमिकांची धडपड सुरू आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशच्या सीमांवर श्रमिकांच्या कुटुंबांनी गर्दी केली आहे. त्यांचा हा उघड्यावरचा संसार आणि दिशाहीन होत जाणारी वाटचाल मन सुन्न करणारी आहे. पोलीस श्रमिकांना दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील आनंद विहार येथून हटकून लावतात, तर ते गाजीपूर सीमेवर येतात. गाजीपूर सीमेवरून पुन्हा उत्तर प्रदेश पोलिस हटकतात, तेव्हा ते एखाद्या उड्डाणपुलाखाली किंवा महामार्गावर जमेल तिथे आश्रय घेतात. साधारण दहा दिवसांपासून श्रमिकांचा हा खो-खो सुरू आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Indian railway

पुढील बातम्या