'कोरोना'शी लढताना... भारतातील पहिल्या रुग्णाची व्हायरसवर मात, शेअर केला अनुभव

'कोरोना'शी लढताना... भारतातील पहिल्या रुग्णाची व्हायरसवर मात, शेअर केला अनुभव

भारतातील (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) पहिल्या रुग्णाला (Patient) डिस्चार्ज मिळाला, त्यानंतर तिनं दिलेल्या मुलाखतीत आपला कोरोनाव्हायरशी लढतानाचा पूर्ण अनुभव सांगितला आहे. तिचा हा अनुभव खरंच खूप प्रेरणादायी आहे.

  • Share this:

तिरुवनंतरपुरम 24 फेब्रुवारी : "मला कोरोनाव्हायरसचं निदान झालं, रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मी आता जगेन की नाही, याची चिंता माझ्या कुटुंबाला होती. इतर लोकांनीही माझ्याबाबत चिंता व्यक्त केली. मात्र तरी मी खचले नाही. अगदी कोरोनाव्हायरस झाल्याचं समजल्यापासून मन घट्ट केलं आणि त्याच्याशी लढायचं जिद्द ठेवली. या लढाईत आपणच जिंकणार हा आत्मविश्वास मला होता आणि मी ते करून दाखवलं"

भारतातील पहिल्या कोरोनाव्हायरसच्या (India first coronavirus patient) रुग्णाचे हे शब्द. कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक सर्वांनी आशा सोडली मात्र तिनं नाही. 24 वर्षांची निशा (नाव बदललेलं) चीनच्या (China) वुहानमध्ये (Wuhan) वैद्यकीय शिक्षण घेत होती. वुहानमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर चीन सोडून ती भारतात परतली. आपल्याला कोरोनाव्हायरसची लागण झाली असावी याची कल्पनाही तिनं केली नव्हती, मात्र आपल्याला कोरोनाव्हायरस झाला हे समजताच ती खचली नाही, तर मानसिकरित्या मजबूत झाली. जिथं कोरोनाव्हायरस ऐकताच लोकांच्या पायाखालची जमीन सरकतेय, तिथं ती घट्ट पाय रोवून कोरोनाशी दोनहात करण्यासाठी ती तयार झाली.

केरळातल्या थ्रिसुर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. बरी झाल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत आपला कोरोनाव्हायरशी लढतानाचा पूर्ण अनुभव सांगितला आहे. तिचा हा अनुभव इतर कोरोनाव्हायरसच्या रुग्णांसाठी प्रेरणादायी आहे.

निशा म्हणाली, "जानेवारी हा चीनमध्ये सुट्टीचा कालावधी असतो. त्यामुळे या सुट्टीत घरी न येता आम्ही तिथं राहून अभ्यासाला वेळ देण्याचं ठरवलं होतं. मात्र चीनमध्ये कोरोनाव्हायरस पसरला. त्यानंतर माझ्या पालकांनाही माझी काळजी वाटू लागली. ही परिस्थिती इतकी गंभीर होईल, असं मला वाटलं नव्हतं. त्यानंतर मी चीन सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 22 जानेवारीला मला दुसऱ्या दिवशीचं कोलकात्याला जाण्यासाठी तिकीट मिळालं. मात्र त्याच रात्री ज्या वुहानमधून कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला तिथली सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. तेव्हाच मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत कसेबसे बाहेर पडले आणि जवळच्या विमानतळावर जाणारी शेवटची ट्रेन गाठली"

हेदेखील वाचा -  अवघ्या 7 महिन्यांच्या जीवाची 'कोरोना'शी टक्कर, दहशतीत ठेवणाऱ्या व्हायरसला हरवलं

निशानं प्रवास करताना आवश्यक ती काळजी घेतली आणि अखेर चीनहून ती आपल्या देशात भारतात परतली. मात्र जे होऊ नये, तेच झालं. तिला कोरोनाव्हायरस झाला

निशा  म्हणाली, "चीनहून परतलेल्या आम्हाल सर्वांना काही दिवस वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं होतं. 2 दिवसांनी मला ताप येऊ लागला, घशाचं इन्फेक्शन झालं. मी तात्काळ आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलं आणि स्वत:ला रुग्णालयात दाखल करून घेतलं. माझा कोरोनाव्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र मी घाबरले नाही, खचले नाही. तर स्वत:ला मानसिकरित्या तयार केलं, त्यामुळे मी या व्हायरशी लढण्यासाठी अधिकच स्ट्राँग झाले"

निशाला तब्बल 24 दिवसांसाठी एका विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. खरंतर अशा परिस्थितीत आपलं कुणीतरी जवळ असावं असं वाटतं. तिचं खरं कुटुंब तिच्यापासून दूर होतं, तरी तिला कधीच एकटं वाटलं नाही.

निशा सांगते, "आता आपल्याला इथं भरपूर दिवस राहावं लागू शकतं, हे मला माहिती होतं. तरी मला कधीच एकटं वाटलं नाही. माझ्याकडे फोन होता, त्यावरून मी माझ्या कुटुंबाच्या संपर्कात होते. शिवाय इंटरनेट असल्यानं बाहेर नेमकं काय होतं आहे, तेदेखील मला समजत होतं. मला जे काही खावंसं वाटत होतं, ते खायला मिळत होतं. खाण्यावर कोणतंच निर्बंध नव्हतं. माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर्सही मला बरं करण्यासाठी घरदार सोडून रुग्णालयात राहत होते, त्यांच्या या समर्पणामुळे मी अधिकच प्रेरित झाले. एखाद दुसऱ्या वेळी मी मानसिकरित्या खचले होते. मात्र तेव्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी, समुपदेशक यांनी मला त्यातून बाहेर काढण्यास मदत केली. रुग्णालयाचा स्टाफ विशेष प्रशिक्षित आणि खूपच फ्रेंडली होता. जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांनाच झाला"

हेदेखील वाचा - चीनमध्ये 'कोरोना'चं थैमान; शी जिनपिंग म्हणाले, 'ही सर्वात मोठी हेल्थ एमर्जन्सी'

महाभयंकर अशा आजारावर मात केल्यानंतर निशा आता आणखीनच स्ट्राँग झाली आहे, आता ती व्हायरसला अजिबात घाबरत नाही कारण तिनं याला अगदी जवळून पाहिलं आहे.

"जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जेव्हा कोरोनाव्हायरसला हेल्थ एमर्जन्सी (Health emergency) घोषित केलं तेव्हादेखील मी घाबरले नाही, कारण या आजाराला मी अगदी जवळून ओळखू लागले. निरोगी व्यक्तींना या व्हायरसची लागण झाल्यास जास्त समस्या उद्भवणार नाही. मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर आहे, अशांसाठी हा व्हायरस जीवघेणा ठरू शकतो. चीनमध्येदेखील अशा कमजोर व्यक्तींनाच या व्हायरसने आपलं शिकार बनवलं आहे. कोरोनाव्हायरसचा लढा मी जिंकला तो एकटीनं नव्हे. माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर, सोयीसुविधा उपलब्ध करून देणारं सरकार आणि नागरिकांच्या प्रार्थना माझ्यासोबत होत्या, त्या सर्वांना माझा सॅल्युट आहे. माझ्यात आता पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे आणि मला माझ्या वैद्यकीय क्षेत्राबाबत असलेला अभिमान अधिक वाढला आहे", असं निशा म्हणाली.

चीनमधील परिस्थिती सुधारल्यानंतर आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा चीनला जाणार असल्याचं निशानं सांगितलं आणि ज्या लोकांनी तिला साथ दिली त्यांच्यासाठी ती उभं राहणार त्यांची सेवा करणार असा दृढ निश्चय तिनं केला आहे.

First published: February 24, 2020, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading