भारतात कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन; विषाणूतज्ज्ञांचा धक्कादायक दावा

भारतात कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन; विषाणूतज्ज्ञांचा धक्कादायक दावा

भारत (india) कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) भयानक अशा टप्प्यात पोहोचला आहे, असा खळबळजनक दावा या तज्ज्ञांनी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : भारतात (india) कोरोनाव्हायरस (coronavirus) जास्त प्रमाणात पसरू नये, यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. देशात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन (community transmission) होऊ नये, म्हणून सरकार धडपड करत आहे. मात्र भारतात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं आहे, असा दावा भारतातील एका विषाणू शास्त्रज्ञाने केला आहे.

भारतात खूप आधीच कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं आहे, असा धक्कादायक दावा व्हायरोलॉजिस्ट शाहीद जमील यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांंनी ही माहिती दिली. जमील हे मोलक्युलर बायोलॉजी, संसर्गजन्य आजार आणि बायोटेक्नॉलॉजीतील तज्ज्ञ आहेत. वेलकम ट्रस्ट/ डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इंडिया अलायन्सचे ते सीईओ आहेत.

कम्युनिटी ट्रान्समिशन हा कोरोनाव्हायरसचा तिसरा आणि महाभयंकर असा टप्पा आहे. आतापर्यंत परदेशातून आलेल्या किंवा त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांना कोरोनाव्हायरसचं निदान होत होतं. मात्र तिसऱ्या टप्प्यात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीने परदेश प्रवास केलेला नसतो किंवा परदेशाहून आलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीशी तिचा संपर्क आलेला नसतो. एकंदर त्या व्यक्तीला व्हायरसची लागण नेमकी कुठून आणि कशी झाली, याचा धागादोरा सापडत नाही व्हायरसचा स्रोत समजत नाही आणि व्हायरस सर्वत्र पसरू लागतो.

हे वाचा - मुंबई आणि राज्यात आजही कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ, सरकारची चिंता वाढली

जमील यांनी सांगितलं, "आपण खूप कालावधीआधीच कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये पोहोचलो आहोत. फक्त आरोग्य अधिकारी ते मान्य करत नाहीत. अगदी आयसीएमआरने SARI (severe acute respiratory illness) असलेल्या रुग्णांचा अभ्यास केला. त्यावेळी ज्या 40 टक्के रुग्णांना कोविड-19 असल्याचं निदान झालं ते परदेशातून परतलेले नव्हते किंवा तशा कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आले नव्हते. जर हे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही तर मग काय आहे?"

भारतात आता कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, मात्र लॉकडाऊनेपेक्षा आयसोलेशन, क्वारंटाइन आणि टेस्टिंगवर भर द्यावा असं जमील म्हणालेत.

जमील म्हणाले, "लॉकडाऊनचा पुढे फारसा काही फायदा होईल असं मला वाटत नाही. देशव्यापी लॉकडाऊनपेक्षा स्थानिक लॉकडाऊन, आयसोलेशन आणि क्वारंटाइन योजनांवर भर द्यावा. सध्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं सर्वात महत्त्वाचं आहे, जेणेकरून लोकं नियमांचं पालन करतील. कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांप्रमाणे सार्वजनिक आरोग्याच्या समस्या हाताळता येऊ शकत नाहीत"

हे वाचा - लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जाऊ लागलीत लहान मुलं; कारण वाचून व्हाल हैराण

"सध्या 10 लाख लोकसंख्येमागे 1,744 टेस्ट होत आहेत. जगात आपल्या देशाचा टेस्टिंग रेट खूप कमी आहे. आपल्याला अँटिबॉडी टेस्ट आणि आरटी-पीसीआर टेस्ट दोन्ही करायला हव्यात. यामुळे आपल्याला सध्याची संक्रमित प्रकरणं आणि आधी झालेली संक्रमित प्रकरणं याची माहिती मिळेल. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनवरही सातत्याने निरीक्षण राहवं आणि त्यानुसार टेस्टिंग व्हायला हवी यामुळे आपल्याला आवश्यक ती माहिती मिळेल आणि आपली अर्थव्यवस्थाही सुरू करता येईल", असा सल्लाही जमील यांनी दिला आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: May 25, 2020, 9:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading