मुंबई, 1 डिसेंबर : जगभरात कोरोना लसीची (Corona Vaccine) चाचणी अंतिम टप्प्यात आहे. 2021 च्या सुरुवातीपर्यंत एकतरी लस बाजारात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण इतक्या मोठ्या लोकसंख्येला एकसाथ लस देणे शक्य नाही, यासाठी चार टप्प्यात हे लसीकरण करण्याची गरज आहे. यामध्ये ज्या व्यक्तींना अधिक धोका आहे, त्यांना ही लस आधी मिळणार आहे.
पुढील वर्षी जुलैपर्यंत कोरोना लसीचे 50 कोटी डोस तयार करण्याचे आणि 25 कोटी नागरिकांपर्यंत हे पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या लसीच्या वितरणासाठी नॅशनल व्हॅक्सीन ग्रुप तयार करण्यात आला असून, कोणत्या गोष्टींच्या आधारे कुणाला लस द्यायची याचा निर्णय हा ग्रुप घेणार आहे. यासाठी काही नियम देखील बनवले जात आहेत.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना हरियाणामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, सुरुवातीला लसीचा पुरवठा कमी असणार आहे. त्यामुळे धोका कुणाला जास्त आहे, तसंच याची कोणाला गरज आहे ठरवलं जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीला मागणी जास्त असली तरीदेखील पुरवठा कमी असणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सने केंद्रीय सचिव राजेश भूषण यांच्या हवाल्याने एक वृत्त दिलं आहे. यामध्ये किती टप्प्यांमध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे, याची माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीला ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दररोज रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना कोरोना होण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांना लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वछता कर्मचारी आणि पोलिसांना लस देण्यात येणार आहे. घरामधून कचरा जमा करणाऱ्यांचादेखील यामध्ये समावेश आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे. तर चौथ्या टप्प्यात इतर सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी डेटाबेस तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत.
केंद्र सरकारच्या मान्यतेने कोविड लस लाभार्थी व्यवस्थापन प्रणाली वेगवेगळ्या राज्यात तयार केली जात आहे. यूएनडीपीने ती असलेल्या साइट्स ओळखल्या आहेत. कुशल एएनएमला लस प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय स्टाफ नर्स व फार्मा तज्ज्ञही गरजेनुसार मदतीला घेतले जाणार आहेत.
लसीकरणाच्या बाबतीत देशाचं रेकॉर्ड चांगलं आहे. दरवर्षी रोग टाळण्यासाठी गर्भवती व नवजात बालकांना लसीकरण करण्यात येते. यासाठी डेटाबेस तयार करण्याचा अनुभव आहे आणि लस साठवण्याची क्षमतादेखील आहे. लस एका निश्चित तापमानात ठेवली जाते अन्यथा खराब होण्याची भीती असते. यासाठी भारतात सुमारे 27 हजार कोल्ड स्टोरेज आहेत. मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असूनही,कोट्यवधी लोकांपर्यंत लस पोहोचवणे हे एक मोठे आव्हान आहे. रिस्क असेसमेंट करताना हे पहावे लागेल की तरुण लोक बर्याच धोकादायक आजारांनी पीडित आहेत. त्यामुळे त्यांना लसीकरणासाठी वाट पाहावी लागेल की त्यांना पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातच लस मिळेल.
जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्स अलायन्सची स्थापना केली आहे. श्रीमंत देशांनी निधी देऊन ही लस गरीब देशापर्यंत पोहोचण्यासाठी या अलायन्सची स्थापना करण्यात आली आहे. अनेक लस उत्पादक देश यात सामील झाले आहेत आणि 2021 च्या अखेरीस किमान 2 अब्ज डोस जगभरातील देशांमध्ये पोहोचवण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. कोरोना लसीची साठेमारी होणार नाही याकडे लक्ष देणे देखील कोवॅक्सचे उद्धिष्ट आहे. जेणेकरुन ती त्वरित गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकेल. सध्या या संघटनेत 160 हून अधिक देश सामील झाले आहेत, पण अमेरिका आणि रशियासारख्या महासत्ता अजूनही यामध्ये सहभागी झाल्या नाहीत.