नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातलं आहे. दररोज लाखोंच्या संख्येत कोरोनाबाधित आढळत असून हजारोंच्या संख्येत मृत्यू होत आहेत. जगभरातील अनेक देशात हा व्हायरस पुन्हा एकदा आक्रमण करू लागला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसह सर्वांचच लक्ष कोरोना वॅक्सिनकडे (Covid-19 Vaccine) आहे. अमेरिकेत वॅक्सिन तयार झाली आहे. डिसेंबरपासून याचा सप्लाय सुरू केला जाण्याचं बोललं जात आहे. त्याचदरम्यान भारतातही वॅक्सिन कधी येणार याची लोक वाट पाहत आहेत.
कधी येईल वॅक्सिन -
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं की, वॅक्सिन फेब्रुवारी महिन्यापर्यंत बाजारात येऊ शकते. सीरम इंस्टिट्यूट ऑक्सफोर्डच्या कोरोना वॅक्सिनचा एस्ट्रेजेनिका (Oxford-AstraZeneca) मिळून भारतात ट्रायल सुरू आहे. एका कार्यक्रमात बोलताना पूनावाला यांनी सांगितलं की, 2021 च्या पहिल्या तिमाहीमध्ये वॅक्सिनचे 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध केले जातील. आरोग्य कर्मचारी आणि वृद्धांसाठी ऑक्सफोर्ड कोविड-19 ची लस पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत आणि सर्वसामान्यांसाठी एप्रिलपर्यंत उपलब्ध होऊ शकते. 2024 पर्यंत प्रत्येक भारतीयाला लस मिळाली असेल.
किती असेल वॅक्सिनची किंमत -
अदार पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वॅक्सिनची किंमत भारतात अधिकाधिक 1000 रुपये असेल. वॅक्सिनचे दोन डोस घ्यावे लागतील, असंही ते म्हणाले. प्रत्येक डोसची किंमत 500 ते 600 च्या दरम्यान असेल. तर सरकारकडून हे दोन्ही डोस सर्वसामान्यांसाठी जवळपास 440 रुपयांत उपलब्ध करून दिले जातील. सरकारला प्रत्येक डोस 3 ते 4 डॉलरमध्ये दिला जाईल. अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कधीपर्यंत सर्वांनाच मिळणार लस -
पूनावाला यांनी सांगितलं की, 'भारतात प्रत्येक व्यक्तीला लस मिळण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागतील. हा काळ केवळ पुरवठ्यातील कमतरतेमुळेच नाही, तर आपल्याला बजेट, लस, उपकरणं, पायाभूत सुविधादेखील आवश्यक आहेत. लोकांना लस घेण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. संपूर्ण लोकसंख्येच्या 80 ते 90 टक्के लोकांना लसीकरण आवश्यक आहे.'
वॅक्सिनसाठी ऍडव्हान्स बुकिंग -
अनेक कंपन्यांनी ट्रायलमध्ये चांगले परिणाम पाहता, मोठ्या प्रमाणात वॅक्सिनचं उत्पादन सुरू केलं आहे. मोठ्या देशात याच्या खरेदीसाठी मोठी स्पर्धा आहे. अशात भारतानेही 150 कोटीहून अधिक डोस खरेदी करण्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग केल्याचं बोललं जात आहे. वॉल स्ट्रिट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, कोविड-19 वॅक्सिन खरेदीच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.