नवी दिल्ली, 10 जानेवारी : कोरोना व्हायरसचा (Coronavirus in India) संसर्ग वेगाने वाढत असून पुन्हा विविध निर्बंध घातले जात आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने (Southern Railway) मोठा निर्णय घेतलाय. सोमवारपासून (10 जानेवारी) चेन्नई लोकल ट्रेनमध्ये (Chennai local train) केवळ अशाच लोकांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे, ज्या लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे (covid 19 vaccine) दोन्ही डोस घेतले आहेत. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असं दक्षिण रेल्वेच्यावतीने सांगण्यात आलंय. मास्क नसलेल्या प्रवाशांकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचेही रेल्वे विभागाने स्पष्ट केलंय.
दक्षिण रेल्वेने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सोमवारपासून चेन्नई उपनगरी ( Chennai suburban -चेन्नई लोकल ट्रेन) रेल्वे प्रवासासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रेल्वे प्रवाशांना कोरोना संदर्भात असणाऱ्या नियमावलीचे पालन करावे लागेल.
वेगाने पसरत असलेला कोरोनाचा संसर्ग आणि कोविडचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे तमिळनाडू सरकारने राज्यात 6 जानेवारी 2022 पासून अनेक निर्बंध लादले आहेत. उपनगरीय रेल्वे सेवा 50 टक्के क्षमतेने चालवण्याचे निर्देश राज्य सरकारने रेल्वेला दिले आहेत. राज्य सरकारच्या गाइडलाइन आल्यानंतर रेल्वेनेही प्रवाशांसाठी कडक नियम केले आहेत. प्रवाशांना तिकीट किंवा मासिक तिकीट पास (MST) घेताना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे सर्टिफिकेट दाखवावे लागेल. ज्यांच्याकडे लसीकरणाचे सर्टिफिकेट असेल त्यांनाच तिकिटे दिली जातील, असे रेल्वेने स्पष्ट केल आहे.
रेल्वे प्रवास होणार महाग -
रेल्वे आता खासगी शाळांच्या धर्तीवर स्टेशन डेव्हलपमेंट चार्ज (SDF) आकारण्याची तयारी करत आहे. म्हणजेच आतापर्यंत तुम्ही फक्त ट्रेनच्या प्रवासासाठीच भाडे द्यायचा, पण आता तुम्हाला स्टेशनवर येण्यासाठी आणि तिथल्या सुविधा वापरण्यासाठीही शुल्क भरावं लागणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार हे शुल्क वेगवेगळ्या वर्गातील प्रवाशांसाठी वेगवेगळं असेल. लोकल ट्रेन (Suburban) आणि सीझन तिकीट (Season Ticket) यांच्यावर मात्र हे शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रवाशांच्या सुविधा आणि विकास शुल्काच्या नावाखाली रेल्वे हे शुल्क वसूल करणार आहे. ज्या रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार आहे, त्यासाठीही हे शुल्क आकारलं जाणार आहे.
किती शुल्क आकारलं जाईल?
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे शुल्क 10 ते 50 रुपयांदरम्यान असणार आहे. जर तुम्ही एसी क्लासने प्रवास करत असाल तर हे शुल्क 50 रुपये असेल. स्लिपर क्लाससाठी 25 रुपये आणि अनारक्षित क्लाससाठी 10 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क वेगळं भरावं लागणार नाही. ज्याप्रमाणे शाळेच्या फीमध्ये डेव्हलपमेंट चार्जचा समावेश केला जातो, त्याचप्रमाणे हे शुल्क रेल्वेच्या तिकिटात समाविष्ट केलं जाईल.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता प्रत्येक राज्यात विविध निर्बंध लादण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे सर्टिफिकेट पाहिल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षिण रेल्वेने सुद्धा लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे सर्टिफिकेट सक्तीचे केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.