नवी दिल्ली, 26 एप्रिल: सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये लॉकाडाऊन (Corona Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. तर काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असूनही देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona cases in India) मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, काल (रविवारी) एका दिवसांत तब्बल 3 लाख 54 हजार 531 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असून काल कोरोना मृतांच्या (Corona death in India)आकड्यानेही विक्रमी झेप घेतली आहे. काल दिवसभरात एकूण 2806 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशाच्या चिंता वाढताना दिसत आहेत.
मागील काही दिवसांपासून देशात सर्वाधिक नवीन रूग्णांची आणि मृतांची नोंद होत आहे. देशात सलग सहाव्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा साडेतीन लाखांहून अधिक नोंदवला गेला आहे. देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 73 लाख 4 हजार 308 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर मृतांची संख्या 1 लाख 95 हजार 116 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर कोरोना संसर्गातून बरं होणाऱ्यांचं प्रमाणही घटलं आहे.
सध्या देशात 28 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. तर देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 28 लाख 7 हजार 333 एवढी आहे. ही संख्या एकूण कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत 16.2 टक्के एवढी आहे. दुसरीकडे कोरोनामधून बरं होणाऱ्या रुग्णांच प्रमाणही घटलं असून हे प्रमाण 82.6 टक्के एवढं झालं आहे. आकडेवारीनुसार, कोरोनातून बऱ्या होणाऱ्यांची संख्या वाढून 1 कोटी 42 लाख 96 हजार 640 झाली आहे, तर मृतांचा आकडा 1.13 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
हे ही वाचा-कोरोनाला हरवायचय! तणावात नैराश्य झटकून उभे राहा; या टीप्स देतील नवी दिशा
महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
देशात मागील चोवीस तासांत मृत्यू झालेल्या 2806 रुग्णांपैकी 832 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याव्यतिरिक्त दिल्लीत 350, उत्तर प्रदेशात 206, छत्तीसगडमध्ये 199, कर्नाटकात 143, गुजरातमध्ये 157, झारखंड 103 आणि बिहारमध्ये 350 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.