West Bengal Assembly Elections 2021: निवडणूक प्रचार बंगालला पडला महागात! कोरोना मृत्यूदर प्रचंड वाढला

West Bengal Assembly Elections 2021: निवडणूक प्रचार बंगालला पडला महागात! कोरोना मृत्यूदर प्रचंड वाढला

बंगालमध्ये कोरोनाने (Corona Cases in West Bengal) हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सोमवारी राज्यात 4511 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 13 एप्रिल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Elections 2021) पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार सभा काढताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेस (TMC), भाजप (BJP) आणि काँग्रेस तसंच इतर डावे पक्ष प्रचारासाठी रॅली काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. सभा आणि रोड शोसाठी लाखोच्या संख्येनं गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात कोरोना नियमांचंही सर्रास उल्लंघन होत आहे. अशात आता बंगालमध्ये कोरोनाने (Corona Cases in West Bengal) हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सोमवारी राज्यात 4511 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या एका दिवसात नोंदवली गेलेली राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. पश्चिम बंगालमध्ये मृत्यूदर 1.7 झाला आहे. हा दर महाराष्ट्राइतकाच आहे. यापेक्षा जास्त दर देशात पंजाब आणि सिक्किममध्ये आहे.

मागील सात दिवसांची आकडेवारी पाहिल्यास बंगालमध्ये दररोज 3,040 रुग्ण आढळून येत आहेत. बिहारमध्ये हा आकडा 2,122 तर झारखंडमध्ये 1,734 आणि ओडिसामध्ये 981 आहे. आसामबद्दल बोलायचं झाल्यास इथे नव्या रुग्णांची संख्या 234 इतकी आहे. बंगालच्या तुलनेत ही संख्या केवळ 10 टक्के आहे. पश्चिम बंगाल रुग्णसंख्या अधिक आढळून येण्याच्या बाबतीतही देशात सातव्या क्रमांकावर आलं आहे. बंगालमध्ये कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 6.5 टक्के आहे. संपूर्ण देशात हा आकडा 5.2 टक्के आहे.

याचाच अर्थ बंगालमध्ये 100 लोकांची कोरोना चाचणी केल्यास यातील 6.5 टक्के लोक पॉझिटिव्ह येत आहेत. बंगालचे शेजारी राज्य असणाऱ्या बिहार, झारखंड, आसाम आणि ओडिसासोबत तुलना केल्यास बंगालमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र आहे.

निवडणूक प्रचारासाठी घेण्यात येत असलेल्या रॅलीमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन होत असल्याचे फोटो समोर आल्यानंतर निवडणूक आयोगानं यावरुन राजकीय पक्षांना नियमांचं पालन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, यानंतरही हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचं पाहायला मिळालं. रॅली आणि सभांसाठी लाखोच्या संख्येनं लोक एकत्र येत आहे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडत असल्याचं दिसत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 13, 2021, 2:44 PM IST

ताज्या बातम्या