'संघा'च्या या नेत्याला वाटतं काँग्रेसला 100 जागा मिळायला हव्या होत्या

'कांग्रेसने गांधी या कोंडवाड्यातून आपली सुटका करावी,त्यातच त्यांचं भलं आहे.'

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 06:09 PM IST

'संघा'च्या या नेत्याला वाटतं काँग्रेसला 100 जागा मिळायला हव्या होत्या

प्रविण मुधोळकर, नागपूर 24 मे: लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळालं. तर काँग्रेसचा तेवढाच ऐतिहासिक पराभव झाला. भाजपला 303 तर काँग्रेसला फक्त 52 जागांवर समाधान मानावं लागलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विजयाचं स्वागत करत भाजपला शुभेच्छाही व्यक्त केल्यात. संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील याची खात्री होती असं सांगतानाच काँग्रेसला 100 जागा मिळायल्या हव्या होत्या असं मतही व्यक्त केलं.

मा. गो. वैद्य हे दिर्घकाळ तरुण भारताचे संपादकही होते. त्यामुळे राजकीय घटनांकडे पाहण्याची त्यांची वेगळी नजर असते. ते म्हणाले, लोकशाहीत सक्षम विरोधी पक्ष असायला हवा त्यामुळे  काँग्रेसला किमान शंभर जागा मिळायला हव्या होत्या. पण आता तरी काँग्रेसने गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष निवडला पाहिजे. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, मिलिंद देवरा अशा तरुण नेत्यांना घेऊन संघटना काँग्रसने बांधली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.

जोपर्यंत काँग्रेस गांधी या कोंडवाड्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत काँग्रेसचं भलं होणार नाही असं परखड मतही त्यांनी व्यक्त केलं. काँग्रेसने खऱ्या अर्थाने अखिल भारतीय झालं पाहिजे असंही ते म्हणाले.

'हा राष्ट्रवादी शक्तींचा विजय'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या विजयाचं स्वागत केलंय. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेलं ऐतिहासिक बहुमत म्हणजे राष्ट्रवादी शक्तींचा विजय असल्याचं संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतातल्या कोट्यवधी जनतेने स्थिर सरकारसाठी पुन्हा एकदा मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला संधी दिल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Loading...

निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप होतात. कटुता निर्माण होते. आता निवडणूक संपली. प्रचाराच्या वेळी निर्माण झालेली कटुताही आता संपून जावी अशी भूमिकाही संघाने व्यक्त केलीय. हा विजय म्हणजे लोकशाहीचा विजय आहे. या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे असं जोशी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही संघाने कौतुक केलंय. भारतातल्या या निवडणुकीने जगाला लोकशाहीचं दर्शन घडलं आहे. शांतता, सामाजिक सौहार्द कायम राहो आणि एका समर्थ भारताचं दर्शन जगाला घडो असंही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...