नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून गटबाजी आणि अंतर्गत वाद समोर येत असतानाच आता काँग्रेसमधील एका नेत्यानं पत्र लिहून आणखीन एक मागणी केल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस नेत्यांकडून अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर पक्षातील वाद चव्हाट्यावर आली आहेत. हे पत्र लिहिलेल्या एका नेत्यानं राहुल गांधींच्या नेतृत्वासंदर्भात पत्रातून मागणी केली आहे.
'एनडीटीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार या काँग्रेस नेत्यानं पत्रातून 2024 च्या निवडणुकीचं नेतृत्व राहुल गांधींकडे देऊ नये अशी मागणी केली आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये मोठा पराभव मिळाल्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधींकडे काँग्रेसची धुरा देऊ नये, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसची कमान राहुल गांधींनी सांभाळावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच आता अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येत आहेत. पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधींना पाठिंबा देणारा एक गट आणि दुसरा त्यांना विरोध करणारा गट अशी गटबाजी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हे वाचा-CBI ने जवळपास 10 तास केली रियाची चौकशी, ड्रग डीलबाबत खुलासा झाल्याची शक्यता
'2024च्या निवडणुकीत राहुल गांधी पक्षाचं नेतृत्व करून 400 जागा जिंकून आणू शकतील हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आणि भाजपचा विजय झाला.' असंही काँग्रेसच्या नेत्यानं या पत्रामध्ये लिहिल्याची माहिती मिळाली आहे.
2019च्या निवडणुकीत काँग्रेसचा धोबीपछाड झाल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी या काँग्रेसची कमान सांभाळत असून आता पुन्हा एकदा या अध्यक्षपदाच्या निवडीवरून धुसफूस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2024 च्या निवडणुकीला या गटबाजीचा फायदा भाजपला होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.