'...तरीही मोदी सरकारचं हृद्य अन्नदात्यासाठी पाघळत नाही...' सोनिया गांधी यांनी लिहिलं खरमरीत पत्र

'...तरीही मोदी सरकारचं हृद्य अन्नदात्यासाठी पाघळत नाही...' सोनिया गांधी यांनी लिहिलं खरमरीत पत्र

दीर्घकाळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अनेक नेत्यांनी आपला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारवर उघड टीका केली आहे. आता सोनिया गांधी यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 3जानेवारी : केंद्र शासनाने (Central Government) केलेले नवे कृषी कायदे (New farm laws) रद्द केले जावे दिल्लीतील शेतकरी आंदोलन (farmer protests) एक महिन्याहून अधिक काळ सलग सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमधील अनेक वाटाघाटींचे प्रयत्न अजून तरी यशस्वी होताना दिसत नाहीत. या आंदोलनाला डाव्यांसह काँग्रेसचाही (Congress) पाठिंबा आहे. आज काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी (Congress President Sonia Gandhi) आंदोलाबाबत आपल्या भावना एका व्हीडिओद्वारे विस्तारानं व्यक्त केल्या आहेत.

या व्हीडिओत (Video) सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे, 'हाडं गोठवणारी थंडी आणि पावसात गेले 39 दिवस सलग संघर्ष करणारे शेतकरी पाहिले, की देशबांधवांसारखंच माझंही मन अतिशय भरून येतं आहे. या आंदोलनाबाबत सरकारचं कोडगेपण अतिशय वाईट असून त्यामुळं तब्बल 50 शेतकरी आजवर आपला जीव गमावून बसले आहेत. काही शेतकऱ्यांना तर सरकारनं केलेली उपेक्षा इतकी जिव्हारी लागली, की त्यांनी आत्महत्या केली. मात्र यामुळे ना निर्दय मोदी सरकारचं हृदय पाघळलं, ना पंतप्रधान वा एखाद्या मंत्र्याच्या तोंडून एखादा सांत्वनपर शब्द निघाला. मी सगळ्या दिवंगत शेतकरी बांधवांना मनापासून श्रद्धांजली वाहते आणि त्यांच्या नातेवाईकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते.'

पुढं त्या म्हणतात, 'स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात इतकं उन्मत्त सरकार सत्तेत आलं आहे. या सरकारला देशाचे सामान्य नागरिक तर सोडाच पण सगळ्यांच्या मुखी अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांचंही दुःख आणि संघर्ष दिसत नाही. असं वाटतं आहे, की मूठभर उद्योगपती आणि त्यांचा नफा निश्चित करणं हाच सरकारचा मुख्य अजेंडा आहे.

जनभावनेला अव्हेरणारं सरकार आणि नेते लोकशाहीत जास्त काळ टिकाव धरू शकत नाही हा इतिहास आहे. केंद्र सरकारच्या 'थकाओ और भगाओ' या धोरणापुढे किसानपुत्र आणि कष्टकरी गुडघे टेकणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे.अजूनही वेळ आहे, आतातरी मोदी शासनानं ते तीन काळे कायदे मागे घेत थंडी-पावसात आंदोलनमग्न असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. हाच राजधर्म आहे आणि शेतकऱ्यांबाबतची खरी कळकळसुद्धा.'

'मोदी सरकारनं हे लक्षात ठेवलं पाहिजे, की लोकशाहीचा खरा अर्थ जनसामान्य आणि शेतकरी कष्टकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणं हाच आहे.' असं म्हणत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे.

सरकार आणि शेतकरी यांच्यात आजवर चर्चेच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. दिल्लीत आज सकाळपासूनच थंडीची लाट आणि जोरदार पाऊस झाला. मात्र या सगळ्यातही शेतकरी ठामपणे संघर्ष करत उभे आहेत.

Published by: News18 Desk
First published: January 3, 2021, 6:35 PM IST

ताज्या बातम्या