काँग्रेसचे नेते शोधताहेत पराभवाची कारणं, मात्र राहुल गांधी गेले कुठे?

काँग्रेसचे नेते शोधताहेत पराभवाची कारणं, मात्र राहुल गांधी गेले कुठे?

'काँग्रेसला एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असून राहुल गांधीच त्यासाठी योग्य आहेत.'

  • Share this:

नवी दिल्ली 16 जून : लोकसभेतल्या दारुण पराभवातून काँग्रेस अजुन सावरेलेली नाही. काँग्रेसचे नेते पराभवाची कारणं शोधण्यासाठी दिल्लीत बैठका घेत आहेत. चर्चा करत आहेत. मात्र या चर्चेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच सहभागी होत नाहीत. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे ती म्हणजे राहुल गांधी गेले कुठे? राहुल गांधी जास्त सुट्ट्या घेतात आणि न सांगता सुट्टीवर जातात अशी टीका केली जाते. आता पुन्हा एकदा राहुल गांधींच्या दिल्लीत नसल्याची चर्चा सुरू झालीय.

संसदेचं अधिवेशन सोमवारपासून (17 जून ) सुरू होतंय. त्यासाठी विविध बैठकांचं सत्र दिल्लीत सुरू आहे. मात्र या सर्वच बैठकांना राहुल गांधी उपस्थित नाहीत. आठवडाभरापूर्वी राहुल हे वायनाड या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे तीन दिवसांमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर ते लंडनला सुट्टीसाठी गेले अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आठवडाभरासाठी ते लंडनमध्ये राहणार आहेत. सोमवारी 17 जूनला ते दिल्लीत परत येणार आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.

या आधीही राहुल यांच्या सुट्टीवर जाण्याची चर्चा अनेकदा रंगली होती. काही वर्षांपूर्वी राहुल हे 10 दिवस कुठे गेले यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. काही फोटोही व्हायरल झाले होते. नंतर राहुल हे विपश्यनेसाठी थायलंडला गेले असल्याचं स्पष्ट झालं. नंतर कैलास मानसरोवर यात्रेला जाताना मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून आणि ट्विटरवरून त्याची माहिती दिली होती.

राहुल गांधींनी लोकसभेच्या प्रचारात प्रचंड मेहनत घेतली होती. त्यानंतर पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी राजनामा देण्याची घोषणा करत नवा अध्यक्ष निवडावा असं ज्येष्ठ नेत्यांना  सांगितलं होतं. मात्र सर्वच नेत्यांनी त्यांचा राजीनामा फेटाळत त्यांनाच पदावर राहण्याचा आग्रह धरला. काँग्रेसला एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असून राहुल गांधीच त्यासाठी योग्य आहेत असं मत ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी व्यक्त केलंय.

First published: June 16, 2019, 8:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading