नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : काँग्रेसमध्ये (Congress G-23) पूर्णवेळ अध्यक्षाची निवड व्हावी, तसंच पक्षांतर्गत निवडणुका व्हाव्यात अशी मागणी करणारं पत्र 2020 साली काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) लिहिलं होतं. काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेलं हे पत्र माध्यमांमध्ये लिक झालं आणि त्यानंतर खळबळ उडाली. 23 नेत्यांनी हे पत्र लिहिल्यामुळे त्याला जी-23 म्हणजेच ग्रुप ऑफ 23 असं नाव देण्यात आलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) देखील सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या G-23 चे भाग होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी G-23 बद्दल खळबळजनक आरोप केले आहेत. G-23 हा मोदी-शाह यांचा ट्रॅप आहे. माध्यमांमधून भूमिका मांडल्याने पक्षाचं नुकसान होत आहे. पक्ष नेतृत्वासमोर नेत्यांनी आपली भूमिका मांडावी. आपलं मत मांडताना सार्वजनिक भूमिका मांडू नये. देशाच्या प्रश्नांपेक्षा एखाद्या नेत्याने काही बोललं तर जास्त लक्ष दिलं जातं, असं नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही आहे, प्रत्येकाला मत ठेवण्याचा अधिकार आहे. भाजपमध्ये लोकशाही संपुष्टात आली आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली. G-23 मध्ये असणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वावर टीका केली, यावरूनही नाना पटोलेंनी आझाद यांना लक्ष्य केलं.
वर्षभरापासून गुलाम नबी आझाद कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना सर्व सेवा पुरवल्या जात आहेत, त्यांना पद्मश्री दिलं जात आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. तसंच राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत, अशी भूमिकाही पटोलेंनी मांडली. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनासंदर्भात दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक आहे. या बैठकीसाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्लीला आले आहेत. नोव्हेंबर महिन्यात 18 दिवस भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असणार आहे.
काँग्रेसच्या G-23 मधल्या गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, जितीन प्रसाद आणि योगानंद शास्त्री पक्षातून बाहेर पडले आहेत, तर आनंद शर्मा नाराज आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.