मोदी म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रतिक, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
समाजाची जात, धर्म, पंथ, प्रांत अशी विभागणी केली जातेय त्याचबरोबर भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.
नवी दिल्ली, 18 मार्च : काँग्रेसच महाअधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या आक्रमक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला. कर्जबुडव्या नीरव मोदी, आयपीएलच्या माध्यमातून गंडा घालणारा ललित मोदी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आडनावं सारखीच आहेत असं सांगत त्यांनी पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराचं प्रतिक असल्याचं सूचित केलं. देशात शेतकरी आत्महत्या करत असताना आणि युवक बेरोजगार असताना पंतप्रधान योग करायला सांगत आहेत अशी कडक टीकाही त्यांनी केली.
राहुल गांधींच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे
काही हजार वर्षांआधी कुरूक्षेत्रावर महाभारत झालं होतं. कौरव आणि पांडवांमध्ये तुंबळ युद्ध झालं होतं. त्यात पांडव संख्येनं कमी असले तरी त्यांचा विजय झाला कारण ते विनम्र होते, शांत होते, सत्याच्या बाजूने होते. तर कौरव अहंकारी आणि उन्मत्त होते असं सांगत त्यांनी काँग्रेस म्हणजे पांडव आणि भाजप म्हणजे कौरव असल्याचं सुचित केलं.
काँग्रेस हा देशाचा आवाज आहे तर भाजप फक्त एका संघटनेचा आवाज आहे. रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणं, भ्रष्टाचार कमी करण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं या आश्वासनांचं नेमकं काय झालं?
भाजपचं राजकारण व्देषाचं तर काँग्रेसचं राजकारण हे प्रेमाचं आहे. त्यांनी आम्हाला मारलं तरीही आम्ही त्यांच्यावर प्रेमच करत राहणार
गुजरातमध्ये आम्ही त्यांना घाम फोडला आता 2019 मध्ये निवडणूका कशा जिंकतात आणि कशा लढवतात हे आम्ही भाजपला दाखवून देवू.
मी 15 वर्षांपासून राजकारणात आहे. या काळात खूप चुका झाल्या, आम्ही खाली पडलो, पुन्हा सावरलो, चुका कबूल केल्या आणि शिकत गेलो. चुका कबूल करण्याऐवढं मोठं मन आमच्याकडे आहे.
काँग्रेसच्या तरूण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ती ऊर्जाच बदल घडवू शकते. पण आज कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एक भिंत आहे. ही भिंत पाडल्याशिवाय मी राहणार नाही. ही भिंत पाडणारच.
ही भिंत पाडताना जुने आणि नव्यांची मोट बांधणार. ज्येष्ठ नेत्यांनाही तेवढाच आदर आणि सन्मान देणार. मात्र बदल घडवणारच
केवळ पैसे नाहीत म्हणून आता कार्यकर्त्यांना तिकीटं नाकरली जाणार नाहीत. गुजरातमध्ये आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना तिकीटं दिली आणि त्याचे परिणाम सगळ्यांना दिसले.
आज सगळे नेते खाली बसले आहेत स्टेजवर कुणीही नाही, हे स्टेज कार्यकर्त्यांसाठी मोकळं ठेवलं आहे.