निवडणुकीची तयारी: प.बंगालमध्ये ममता दीदी पुजाऱ्यांना देणार घर आणि महिन्याला हजार रुपये!

निवडणुकीची तयारी: प.बंगालमध्ये ममता दीदी पुजाऱ्यांना देणार घर आणि महिन्याला हजार रुपये!

'आम्ही सर्वधर्म मानणारे आहोत असंही त्यांनी सांगितलं. इमामांना मदत ही वक्फ बोर्डाच्या विकास निधीमधून दिली जाते.'

  • Share this:

कोलकाता 14 सप्टेंबर:  पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांना थोडा अवधी असला तरी तयारी मात्र  सुरू झाली आहे. इमामांना आर्थिक मदतीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता ब्राम्हण पुजाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा सोमवारी केली. या पुजाऱ्यांना महिन्याला 1 हजार आणि राहायला घर देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यात इमामांना आर्थिक मदत देण्याची घोषणा 8 महिन्यांपूर्वी त्यांनी केली होती. त्यानंतर भाजपने जोरदार टीका केली होती.

ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, सनातन धर्माचे ब्राम्हण पुजारी अनेक वर्षांपासून मठ आणि मंदिरात पूजा-अर्चा करत आहेत. मात्र त्यांना कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

दूर्गा पुजेच्या काळापासून मदतीला सुरुवात केली जाणार आहे. आम्ही सर्वधर्म मानणारे आहोत असंही त्यांनी सांगितलं. इमामांना मदत ही वक्फ बोर्डाच्या विकास निधीमधून दिली जाते असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांचं सरकार हे हिंदू विरोधी मानसिकतेचं असल्याचा आरोप केला आहे. त्या फक्त मतांसाठी तुष्टीकरणाचं राजकारण करतात असा आरोप त्यांनी केला. भाजपच्या राज्य कार्यकारणीला संबोधित करतांना त्यांनी हा आरोप केला.

UGC NET 2020: युजीसी-नेट परीक्षा लांबणीवर, जाणून घ्या नवं वेळापत्रक

ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध भाजपने जोरदार मोहिम सुरू केली आहे. सरकार हे मुस्लिमांचं मतांसाठी लांगूनलाचन करते असा भाजपचा आरोप आहे. भाजपच्या अनेक कर्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे असा आरोपही भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी केला आहे.

2019च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये सभा घेऊन जोरदार वातावरण निर्मिती केली होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 14, 2020, 10:25 PM IST

ताज्या बातम्या