सोशल डिस्टन्सिंगची एैशी की तैशी, लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दुकानांबाहेर भल्या मोठ्या रांगा

सोशल डिस्टन्सिंगची एैशी की तैशी, लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दुकानांबाहेर भल्या मोठ्या रांगा

पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर नागरिक संभ्रमात होते

  • Share this:

मुंबई, 24 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवस लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केल्यानंतर देशभरात गोंधळ निर्माण झाला आहे. मोदींनी केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. मोदींनी आपल्या भाषणात त्यासंदर्भात भाष्य न केल्याने ठिकाठिकाणी लोकांनी गर्दी करीत वस्तू खरेदी करीत असल्याचं चित्र होतं.

यानंतर काही वेळातचं मोदींनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विट करुन स्पष्टता आणली. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं. पंतप्रधानांचे लॉकडाऊनच्या घोषणेचे भाषण संपल्यानंतर लगेचच नागरिक घराबाहेर पडले आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किराणामालाच्या दुकानात मोठी गर्दी केली.

संबंधित -जनता कर्फ्यूपेक्षा कडक असणार या लॉकडाउनचे नियम - मोदींनी दिला इशारा

पुढील 21 दिवस पुरेल इतका धान्यसाठा घेता यावा, यासाठी दुकानांबाहेर अक्षरश: शेकडोंची गर्दी होती. अनेक ठिकाणी तर हे संकट पाहता दुकानदारांनी तातडीने दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. तरीही नागरिक दुकानांबाहेर घोटाळत असल्याचे दृश्य जागोजागी पाहायला मिळाले. किराणामालाव्यतिरिक्त दुधाची खरेदी करण्यासाठीही मोठी गर्दी होती.

याशिवाय भाजी, मेडिकल स्टोअर्स, गिरण्या येथे मोठ्या रांगा लागल्या.  सगळ्याच ठिकाणी घबराटीत असेलेले नागरिक मोठ्या संख्येने दिसत होते. काही काही तर जीवाचा आटापिटा करत आहे ती वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करत होते. कोरोनाचा (Covid - 19) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचसाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र लोकांनी मोठी गर्दी करीत सोशल डिस्टन्सिंगवर हरताळ फासला आहे.

संबंधित - दुकानांबाहेर गर्दी करुन तुम्ही जीव धोक्यात घालताय, मोदींचं ट्विट करुन कळकळीचं आवहन

First published: March 24, 2020, 10:13 PM IST

ताज्या बातम्या