चित्रकूट, 27 जानेवारी : लग्नासाठी नवरदेव, नवरीसह त्यांच्या कुटुंबियांकडून अनेकदा चित्र विचित्र अटी घातल्या जातात. लग्नाच्या मंडपात अशा अटींमुळे लग्न मोडल्याचे प्रकारही अनेकदा समोर आले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील चित्रकूट इथं घडला. नवरदेवाने अशी काही अट घातली की त्याच्याच वडिलांनी भर मंडपात कानशिलात लगावली. यानंतर नवरदेवानेही वडिलांना मारलं. भरमंडपात बापलेकांमध्ये जुंपल्याने वधुसह तिचे कुटुंबियसुद्धा गोंधळले आणि याच गोंधळात वधुने लग्नासाठी नकार दिला. हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचलं मात्र दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये कोणीच माघार घेण्यास तयार नसल्यानं अखेर लग्न न करताच दोन्ही कुटुंबिय परतले.
उत्तर प्रदेशातील चित्रकूट इथं शिवरामपूरमध्ये ही घटना घडली. शिवनाथ पटेल यांच्या मुलीचं लग्न कानपूरच्या अमित कटियारसोबत होणार होतं. लग्नाच्या समारंभात परंपरेप्रमाणे वऱ्हाडाचे स्वागत झाले. पण यादरम्यान नवरदेव सतत वधुच्या खोलीत जाऊन तिच्याशी बोलत होता. तेव्हा रात्री अचानक वधुसह आणि त्याच्या आईने हे लग्न होणार नाही असं सांगितलं.
हेही वाचा : नवरीला उचलताना नवरदेवही खाली पडला, नंतर त्याने जे केलं ते पाहून आवरणार नाही हसू
नवरदेवाने वधुला तिला पुढचे एक वर्ष परत पाठवणी करणार नाही असं सांगितल्याचा आरोप वधुच्या कुटुंबियांनी केला. तसंच पुढचं शिक्षण चित्रकूटमध्ये नाही तर कानपूरमध्ये करावं लागेल अशी अट घातली. यावरूनच वाद झाला आणि नवरदेवाचं वागण पाहून त्याच्या वडिलांनीच भर मंडपात त्याच्या कानशिलात लगावली. यानंतर रागाच्या भरात तरुणानेसुद्धा उलट वडिलांनाही मारहाण केली. लग्नाच्या मंडपात सुरू झालेल्या या मारहाणीच्या प्रकारानंतर वधुसह तिच्या कुटुंबियांना या लग्नाला नकार दिला आणि इतर विधी थांबवण्यात आले.
वधुने लग्नाला नकार दिल्यानंतर नवरदेवाच्या घरच्यांनी असा आरोप केला की, लग्नाच्या आधी ठरल्यानुसार स्वागत आणि लग्नाचे विधी झाले नाहीत. दरम्यान, लग्नाच्या समारंभात घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना समजल्यानतंर ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीही दोन्ही घरच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही माघार घेतली नाही. अखेर पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च परत देण्याची तयारी दाखवली आणि त्यानंतर वऱ्हाड लग्न न लावताच घरी परतले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18