मुंबई, 11 जून :
भारताने चीनच्या 10 जहाजांना आपल्या सागरी हद्दीत शरणागती दिली आहे. चीनची ही जहाजं 'वायू' चक्रीवादळामध्ये फसली होती. या वादळातून त्यांची सुटका करण्यासाठी या जहाजांना रत्नागिरी बंदरात शरणागती दिली आहे.
भारतीय तटरक्षक दलाने चीनच्या या जहाजांना भारताच्या सुरक्षित क्षेत्रात राहण्याची परवानगी दिली, असं भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक के. आर. सुरेश यांनी सांगितलं.
चीनच्या मासेमारी बोटी
याआधी, कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी बोटी आढळून आल्या होत्या. या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला होता. मात्र या बोटींकडे कुठलीही परवानगी नाही अशी माहितीही पुढे आली.
चीनच्या या मासेमारी बोटी दिडशे फुट लांबीच्या आहेत. या मोठ्या बोटी आढळून आल्याने सुरुवातीला सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्या देशाच्या हद्दीत जाण्यासाठी संबंधीत बोटींना विविध परवानग्या घ्याव्या लागतात. त्यानंतरच अशा बोटी त्या सागरी हद्दीत नेता येतात. त्यामुळे दाभोळ पोलीस आणि विविध सुरक्षा संस्था आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
बचावकार्यासाठी एनडीआरएफ तैनात
वायू चक्रीवादळ भारताच्या किनाऱ्यावर आल्यामुळे हवाई दलाला पाचारण करण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांना घेऊन हवाई दलाची विमानं बचावकार्यासाठी निघाली आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकतं आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला 13 जूनला धडकू शकतं. पुढच्या 24 तासांत या चक्रीवादळाचा वेग आणखी वाढू शकतो.
सतर्कतेचे आदेश
वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी किनारपट्टीच्या प्रदेशातल्या स्थितीचा आढावा घेतला. या वादळाच्या धोक्यामुळे गुजरातमधल्या 74 गावांतल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
गुजरातमधले संबंधित सरकारी विभाग आणि किनारपट्टीच्या प्रदेशातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्याहून आणि भटिंडाहून एनडीआरएफच्या प्रत्येकी पाच तुकड्यांना पाचारण करण्यात आलं आहे.
=====================================================================================
VIDEO : दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, तावडेंनी केला महत्त्वाचा खुलासा