आंध्र प्रदेश, 5 डिसेंबर : आंध्र प्रदेशमध्ये एक बालविवाहाचं प्रकरण समोर आलं आहे. ज्यूनियर कॉलेजच्या क्लासरूममध्येच हे लग्न झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पोलिसांनी बालविवाह कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
द हिंदूने दिलेल्या माहितीनुसार, या दोन अल्पवयीन मुला-मुलीचं नक्की कोणी लग्न लावून दिलं, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या दोन अल्पवयीन मुला-मुलीचा, दोघांच्या कुटुंबियांचा आणि कॉलेज प्रशासनाचा पोलिसांकडून जबाब घेण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्यानुसार हे लग्न अवैध, अमान्य असून त्या मुला-मुलीचं काउंन्सलिंग करण्यात आलं आहे.
17 वर्षीय अल्पवयीन मुलाने, मुलीच्या गळ्यात मंगळसुत्र घालून, सिंदुर भरून फोटो काढण्यात आले. वर्गात उपस्थित असलेल्या एका अल्पवयीन मुलीनेच या घटनेचा व्हिडीओ करून तो आपल्या मित्रांमध्ये शेअर केला. या प्रकाराबद्दल माहिती मिळाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने या दोघांना ट्रान्सफर सर्टिफिकेट दिलं असून कॉलेजमधून त्यांच नाव हटवून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
आंध्र प्रदेशच्या महिल्या आयोग अध्यक्ष वसीरेड्डी पद्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे अल्पवयीन क्लासमेट आहेत. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी तिला घरात घेण्यास मनाई केली आहे. मुलीला सध्या 'वन स्टॉप सेंटर'मध्ये काउंन्सलिंगसाठी पाठवण्यात आलं आहे. महिला आयोग सदस्यांनी मुलाच्या कुटुंबियांशी चर्चा केली असून त्याचंही काउंन्सलिंग केलं आहे. महिला आयोग अल्पवयीन मुलीच्या राहण्याची व्यवस्था करणार आहे.
महिला आयोगाच्या संचालक आर सयूज यांनी सांगितलं की, क्लासरुममध्ये अशाप्रकारे विवाह केल्याच्या घटनेनंतर, विद्यार्थ्यांना कायद्याविषयी कमी माहिती असल्याचं समजतं. बाल विवाह, पोक्सो एक्ट, शिक्षणाचा अधिकार याबाबत महिला आयोग महाविद्यालयांमध्ये जागरुकता अभियान चालवत असल्याचंही त्या म्हणाल्या.