Home /News /national /

राज्यात मुख्यमंत्र्यांनी लागू केला कर्फ्यू, काय आहे 'कर्फ्यू आणि लॉकडाऊन'मधील फरक?

राज्यात मुख्यमंत्र्यांनी लागू केला कर्फ्यू, काय आहे 'कर्फ्यू आणि लॉकडाऊन'मधील फरक?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील 75 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे

    नवी दिल्ली, 23 मार्च : देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज इतर देशांच्या तुलनेत जरी भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी असली तरी योग्य ती काळजी न घेतल्यास ही संख्या मोठ्या फरकाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयसीएमआरच्या नव्या आकडेवारीनुसार, देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 415 वर पोहोचली असून सात लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा (Covid -19) सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत जनता कर्फ्यू (Curfew) लागू केला होता. सर्व राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचे (Janata Curfew) अनुसरण करण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं. त्याचवेळी काही राज्यांनी रविवारी संध्याकाळी लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलं होतं. संबंधित - उद्धव ठाकरेंनी घेतला कठोर निर्णय; राज्यात कर्फ्यू लागू, रस्त्यावर फिरणं बंद देशातील 75 जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पंजाब सरकारने राज्यात कर्फ्यू (संचारबंदी) लावला आहे. तरीही, लॉकडाऊन म्हणजे काय आणि ते कर्फ्यूपेक्षा वेगळं कसं? कर्फ्यू आणि लॉकडाउनमध्ये काय फरक आहे यांसारखे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहे. कर्फ्यू (संचारबंदी) म्हणजे काय? कोणत्याही भागात कर्फ्यू लावल्यास नागरिकांना अंतिम मुदतीपर्यंत घरातच राहण्याचे आदेश दिले जातात. आणीबाणीच्या परिस्थितीत सरकारकडून कर्फ्यू लावला जातो. कर्फ्यूच्या प्रशासकीय आदेशानंतर लोकांना घराच्या बाहेर रस्त्यांवर न जाण्याचं आवाहन केलं जातं. कर्फ्यूदरम्यान शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा सर्व बंद राहतात. सरकारने लावलेल्या कर्फ्यूच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यास अटक केली जाऊ शकते व त्याला दंडही होऊ शकतो. लॉकडाऊन म्हणजे काय? लॉकडाऊन ही आपत्कालीन व्यवस्था आहे जी नागरिकांना वेगवेगळं ठेवण्यासाठी केली जाते. लॉकडाऊनच्या वेळी लोकांना एखाद्या क्षेत्रात किंवा इमारतीत राहाण्याची सूचना देण्यात आली असल्यास ते तत्सम भाग सोडून बाहेर जाऊ शकत नाही. बाहेर पडण्यास त्यांना मनाई असते. केवळ आवश्यक गोष्टींसाठी बाहेर जाण्याची परवानगी असते. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवल्या जातात, परंतु त्या सेवा कोणत्या असाव्यात हे प्रशासनावर अवलंबून असते. तसं पाहता बँका, बाजारपेठ, भाजीपाल्याची दुकाने, दुग्धशाळा आदी बाबी खुल्या ठेवल्या जातात. एखादा व्यक्ती औषध, अन्न तत्सम वस्तूंची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडू शकतो. कर्फ्यू आणि लॉकडाऊनमधील फरक कर्फ्यू आणि लॉकडाऊन या दोन्ही वेगवेगळ्या परिस्थितीत लागू केल्या जातात. प्रशासनाने सुरू ठेवलेल्या बाबींनुसार दोघांमधील फरक लक्षात येतो. एखाद्या ठिकाणी दंगल किंवा हिंसाचार झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कर्फ्यू लावते. कर्फ्यू दरम्यान बाजार आणि बँकासारख्या अत्यावश्यक सेवा बंद  राहतात. जेव्हा कर्फ्यू शिथिल होतो तेव्हाच लोकांना या सर्व सेवांचा लाभ मिळतो आणि ते बाहेर पडू शकतात. लॉकडाऊनमध्ये आवश्यक असलेल्या सेवा थांबविल्या जात नाहीत. याक्षणी आपल्या देशात आहे अगदी तसंच. सद्य परिस्थितीत देशातील अनेक राज्ये आणि शहरांमध्ये लॉकडाऊन केले गेले आहे. परंतु बँका, दुग्धशाळा, जीवनावश्यक वस्तूंसाठी दुकाने खुली आहेत. जनतेसाठी आवश्यक सेवा सुरू आहेत. मात्र बहुतांश सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या