चिदंबरम यांनी सांगितलं, तुरुंगातून मोकळ्या हवेत येताच पहिल्यांदा काय केलं?

चिदंबरम यांनी सांगितलं, तुरुंगातून मोकळ्या हवेत येताच पहिल्यांदा काय केलं?

काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम 106 दिवसांनी तुरुंगातून सुटले. पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 डिसेंबर : INX Media Case प्रकरणी तुरुंगात 106 दिवस राहिलेल्या माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरलं. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कांद्याच्या दरवाढीवरून मोदी सरकारवर टीका केली. तसेच घसरत चाललेल्या जीडीपीवरूनही हल्लाबोल केला.

देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून पंतप्रधान मोदींनी मात्र मौन बाळगलं आहे. त्यांनी त्यांच्या मंत्र्यांवर ही जबाबदारी दिली आहे की जनतेच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी. सध्याची आर्थिक मंदी ही मानवनिर्मित आहे असं चिदंबरम म्हणाले.

चिदंबरम मोदी सरकारला अर्थव्यवस्थेबाबत सरकारला सल्ला देणार का असं विचारलं असता ते म्हणाले की, सरकार आमचं म्हणणं ऐकून घेईल याची खात्री तुम्ही देणार का? जर ते होणार असेल तर आम्ही तयार आहे. गेल्या 8-9 महिन्यांत आरबीआयने विकास दर 7.4 वरून 5 टक्क्यांपर्यंत आणला आहे.

काश्मीर मुद्यावरूनही चिदंबरम यांनी सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले की, मी काल रात्री 8 वाजता तुरुंगातून बाहेर पडून मोकळा श्वास घेतला. तेव्हा पहिल्यांदा काश्मीर खोऱ्यातील 75 लाख लोकांसाठी प्रार्थना केली. ज्यांच्या स्वातंत्र्यावर 4 ऑगस्ट 2019 पासून गदा आली आहे.

मला त्या राजकीय नेत्यांची काळजी आहे ज्यांना कोणत्याही आरोपाशिवाय ताब्यात घेतलं आहे. जर आपल्याला आपलं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढलं पाहिजे असंही चिदंबरम म्हणाले.

चिदंबरम यांना INX Media case बद्दलही प्रश्न विचारण्यात आला. यावर चिदंबरम म्हणाले की, न्यायप्रविष्ठ असेलेल्या या प्रकरणावर मी काहीही बोलणार नाही आणि याआधीही बोललो नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नक्कीच सर्व काही स्पष्ट करेल असंही त्यांनी सांगितलं.

Published by: Suraj Yadav
First published: December 5, 2019, 2:11 PM IST

ताज्या बातम्या