नवी दिल्ली, 03 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी भाजपा सरकारवर स्तुतीसुमनं उधळल्याचे पाहायला मिळाले. पी. चिदंबरम यांनी गंगा स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या अभियानावरुन भाजपा सरकारचे जाहीर कौतुक केले आहे. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि यूपीएच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली आधार योजनादेखील पुढे वाढवल्याबाबत त्यांनी भाजपा सरकारची प्रशंसा केली.
चिदंबरम यांनी शनिवारी (3 मार्च) आपले पुस्तक 'अनडॉन्टेड : सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया'चे (Undaunted: Saving the Idea of India) प्रकाशन केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मोदी सरकारच्या काही कामांची जाहीर स्तुती केली तर काही गोष्टींबाबत नाराजीही व्यक्त केली.
जीएसटी, नोटाबंदी निर्णयावर नाराजी
''मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे देशाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त जीएसटी लागू केल्यानं या सरकारने व्यापाऱ्यांचंही प्रचंड नुकसान केले आहे'', अशी टीका करत मोदी सरकारच्या जीएसटी, नोटाबंदी निर्णयामुळे नाराज असल्याचे पी. चिदंबरम यांनी यावेळेस सांगितले.
मोदी सरकारचे कौतुक
टीकास्त्र आणि आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या कामाची स्तुती केली. पुढे चिदंबरम म्हणाले की, '' आधीच्या सरकारच्या तुलनेत मोदी सरकारने एका दिवसात जास्त राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती केली आहे. मोदी सरकारने राबवलेला राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा कार्यक्रम यशस्वी झाला, असे मला वाटते. पुढील सरकार याहून अधिक राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम करेल, अशी अपेक्षा आहे''.
गंगा स्वच्छता अभियानाची प्रशंसा
गंगा स्वच्छता अभियानाचा उल्लेख करत चिदंबरम यांनी म्हटलं की, ''गंगा स्वच्छता अभियानाचा आतापर्यंत कोणताही चांगला परिणाम दिसून आलेला नाही. मात्र गंगा स्वच्छतेसाठी सरकारचे चांगले प्रयत्न सुरू आहेत. आम्ही जवळपास पाच वेळा गंगा स्वच्छतेचा प्रयत्न केला पण अपयशी ठरलो. या लोकांना (मोदी सरकार) यावेळेस अपयश येणार नाही, अशी मी अपेक्षा करतो. या सर्व गोष्टींव्यतिरिक्तही एनडीए सरकार बऱ्याच मुद्यांवर अपयशी ठरले आहे''.
एनडीए सरकारचे कौतुक करत असतानाच, हे सरकार यूपीए सरकारच्याच योजना पुढे राबवत असल्याचीही आठवण करुन द्यायला चिदंबरम विसरले नाहीत. ते म्हणाले की, ''झीरो बॅलेन्स, नो फ्रिल बँक अकाउंट योजनेला 'जन धन' योजना असे नाव दिले. या योजने अंतर्गत यूपीएने 34 कोटी खाती उघडली होती आणि एनडीए सरकारने नवीन 35 कोटी उघडली आहेत''.
'विरोधक म्हणून राहणंच पसंत'
यावेळेस चिदंबरम यांना विचारले की, भाजपा पार्टी पुन्हा सत्तेत आली आणि भाजपाने एखाद्या पदाचा प्रस्ताव समोर ठेवला, तर कोणते पद स्वीकारण्यास आवडेल. यावर चिदंबरम म्हणाले की, मी विरोधी पार्टीचा नेता म्हणूनच राहणं पसंत करेन.
P Chidambaram, Congress: I mean even the most incompetent government will do a few things which are good for the country. How can you deny that? (1/2)(02.03.2019) pic.twitter.com/GxLWY2N0T1
— ANI (@ANI) March 3, 2019
P Chidambaram, Congress: I think their (NDA govt) National Highway programme has been a success, they are building more kilometers per day than we did, I think the next government will build even more as the system is in place. (02.03.2019) https://t.co/eHsg3Ks7u6
— ANI (@ANI) March 3, 2019