Home /News /national /

बापरे ! मुलगी की झाडाचं खोड... दुर्गम भागातल्या 8 वर्षांच्या चिमुरडीची विचित्र आजाराशी झुंज

बापरे ! मुलगी की झाडाचं खोड... दुर्गम भागातल्या 8 वर्षांच्या चिमुरडीची विचित्र आजाराशी झुंज

छत्तीसगडच्या 8 वर्षांच्या मुलीला दुर्मिळ असा ट्रीमॅन सिंड्रोम (Treeman syndrome). झाला आहे, ज्यावर अद्यापही उपचार सापडलेला नाही. जन्माच्या वर्षभरानंतर तिला ही समस्या सुरू झाली.

    रायपूर, 13 फेब्रुवारी : एका दुर्गम भागातील अवघ्या 8 वर्षांची पूजा (नाव बदललेलं). ज्या वयात तिनं हसतखेळत बागडायला हवं, तिथं तिला साधं हलताही येत नाही. एका विचित्र अशा आजाराने तिला जखडून ठेवलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर ही मुलगी आहे की एखाद्या झाडाचं खोड असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. पूजाची अशी परिस्थिती झाली आहे, ते तिला असलेल्या दुर्मिळ अशा सिंड्रोममुळे आणि हा सिंड्रोम आहे ट्रीमॅन सिंड्रोम (Treeman syndrome). छत्तीसगडमधील हे पहिलंच प्रकरण आहे. पूजाच्या कुटुंबाने सांगितल्यानुसार, पूजाच्या जन्माच्या वर्षभरानंतर तिला ही समस्या सुरू झाली. तिच्या डाव्या पायावर एक छोटासा फोड आला होता. तो हळूहळू मोठा झाला आणि दोन्ही पायांवर पसरला आणि तिचे पाय एखाद्या झाडाच्या खोडाप्रमाणे दिसू लागले. पूजाचे फक्त पायच नव्हे मानेपर्यंत तिच्या पूर्ण शरीराची अशीच परिस्थिती आहे. ज्यामुळे तिला हालचाल करणं तर अशक्यच आहे मात्र तीव्र वेदनाही तिला होतात. पूजाला ट्रीमॅन सिंड्रोम म्हणजे एपिडर्मोडिस्प्लासिया वेरुसीफोर्मिस (Epidermodysplasia verruciformis) हा आजार आहे. मेडिकल जर्नलमध्ये सांगितल्यानुसार, याला Lewandowsky-Lutz dysplasia असं म्हणतात. हा दुर्मिळ असा त्वचेचा आजार आहे जो अनुवंशिकतेने (genetic disorder) होते. यामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोकाही बळावतो. 1 ते 20 वयोगटात हा आजार सामान्यपणे आढळतो. एका अंदाजानुसार जगभरात फक्त 200 जणांना ही समस्या असावी आणि तो पूर्णपणे बरा होईल असा कोणताही उपचार अद्याप सापडलेला नाही. हेदेखील वाचा - ग्लुकोमीटर, इन्सुलिन इंजेक्शन-पेनची नाही गरज; Diabetes साठी स्मार्ट पॅच पुरेसंं पूजा आणि तिचं कुटुंब इंद्रावती नदीकाठाजवळील दुर्गम अशा तुमरी गुंडा गावात राहतं. जिथं पावसात लोकं 4 महिन्यांचं रेशन भरून ठेवतात. कारण नदीला पूर आल्यावर पूल पूर्णपणे पाण्याखाली जातो आणि इतर गावाशी त्याचा संपर्क तुटतो. शिवाय माओवाद्यांचा प्रभाव अधिक असलेल्या या गावात कोणतीच सरकारी सुविधा नाही, अगदी आरोग्याच्याही नाहीत. पूजाचे वडील शेतकरी आहेत आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. “मी एक छोटासा गरीब शेतकरी आहे. माझं संपूर्ण कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करता येतील इतके पैसे माझ्याकडजे नाही. तिच्यावर उपचारासाठी मदत करावी अशी विनवणी मी जिल्हा प्रशासनाकडे कित्येक वेळा केली, असं तिच्या वडीलांनी सांगितलं. त्यामुळे आपल्या मुलीला नेमकं झालं आहे हे तिच्या कुटुंबाला तोपर्यंत कळलं नाही, जोपर्यंत तिचे वडील तिला सरकारी आरोग्य शिबिरात घेऊन गेले नाही. पहुरनारमध्ये वैद्यकीय कॅम्प लागल्याचं समजलं, तेव्हा पूजाचे वडील आपल्या मुलीला घेऊन तिथं गेले. डॉक्टरांनी पूजाची परिस्थिती पाहिली, तेव्हा दंतेवाडा जिल्हा रुग्णालयात तिला दाखल करण्यास सांगितलं. रुग्णालयातील वैद्यकीय पर्यवेक्षक डॉ. डी. सी. शांदलिया यांनी सांगितलं की, “जेव्हा पूजाच्या वडीलांना रुग्णालयात जाणं शक्य होत नव्हतं, तेव्हा आम्ही आमची टीम आम्ही तिच्या घरी पाठवायचो आणि उपचारासाठी तिला घेऊन यायचो” हेदेखील वाचा - पेस्ट कंट्रोलनंतर तुम्ही असा हलगर्जीपणा करू नका, 'या' चुका टाळा पूजाबाबत स्थानिक वृत्तपत्रातून माहिती झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव तिला भेटले आणि तिच्या पूर्ण उपचाराचा खर्च सरकार उचलेल अशी घोषणा त्यांनी केली. तसंच तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेतले जातील, असंही सांगितलं. याशिवाय जिल्हाधिकारी टोपेश्वर वर्मा यांनीही शक्य तितकी मदत प्रशासनाकडून केली जात असल्याची माहिती दिली. जिल्हा रुग्णालयात पूजाच्या आजाराचं निदान झाल्यानंतर पूजाला रायपूरच्या मेकाहारा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या आजारावर अद्याप उपचार नाही. मात्र पूजाला बरं करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत, असं तिच्यावर उपचार करणारे डॉ. मृत्यूंजय सिंह यांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Chattisgarh, Health, Skin

    पुढील बातम्या