Home /News /national /

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं राजकीय वादळ; भाजपने थेट ठाकरेंना विचारले प्रश्न

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं राजकीय वादळ; भाजपने थेट ठाकरेंना विचारले प्रश्न

काँग्रेसच्या राज्यात सावरकरांनंतर आता शिवरायांचा अवमान होत आहे असं म्हणत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पुतळ्याच्या चौथऱ्यावर बुल्डोजर चालवतानाचा VIDEO शेअर केला आहे. काँग्रेसबरोबर सत्तास्थापना करणाऱ्या महाराष्ट्रातल्या शिवसेनाप्रणित सरकारलाही चौहान यांनी बोचरे प्रश्न विचारले आहेत.

पुढे वाचा ...
    छिंदवाडा, 12 फेब्रुवारी : काँग्रेसच्या राज्यात सावरकरांनंतर आता शिवरायांचा अवमान होत आहे असं म्हणत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पुतळ्याच्या चौथऱ्यावर बुल्डोजर चालवतानाचा VIDEO शेअर केला आहे. काँग्रेसबरोबर सत्तास्थापना करणाऱ्या महाराष्ट्रातल्या शिवसेनाप्रणित सरकारलाही चौहान यांनी बोचरे प्रश्न विचारले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद मध्य प्रदेशात आता चांगला पेटला आहे. काँग्रेसच्या राज्यात शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, याची दखल महाराष्ट्रातलं शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार घेईल का? छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारं शिवसेना सरकार शिवरायांचा असा अपमान सहन करू शकेल का? असे बोचरे सवाल भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता राजकारण पेटवणार अशी चिन्हं आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या एका शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने शिवरायांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला होता. पुतळा हटवण्यास असलेला विरोध लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने रातोरात बुल्डोझर चालवून चौथरा उद्ध्वस्त केला. त्याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आणि स्थानिक युवकांनी नागपूर-छिंदवाडा महामार्ग अडवून धरला होता. याची बातमी News18 lokmat ने मंगळवारी दिली होती. हे वाचा - मदरशांमध्येही हनुमान चालीसाचे पठण सुरू करा, भाजप नेत्याची मागणी मध्य प्रदेशात सौंसर नगरपालिकेनं ही पुतळा हटवण्याची कारवाई केली. सौंसर शहरातल्या एका चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्यासाठी शहरातल्या एका युवा संघटनेनं शिवाजी महाराजांचा पुतळाही तयार केला होता. चौकात मध्यभागी एक दगडी चौथरा उभारून त्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. महाराजांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी होता. या चौथऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, असं कारण देत नगरपालिकेनं या पुतळ्याला परवानगी नाकारली. दिवसा कारवाई केली तर  लोकांचा रोष होईल. हे लक्षात घेत नगरपालिकेनं रातोरात हा पुतळा पाडण्याचा निर्णय घेतला. बुल्डोझर मागवून रात्रीच चौथरा उद्ध्वस्त करण्याची कारवाई करण्यात आली. लोकांना हे लक्षात येताच ते रस्त्यावर उतरले. छिंदवाडा -नागपूर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. हा पुतळा पुन्हा तिथेच उभा करावा आणि लवकरात लवकर हे काम करावं अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान शिवराजसिंह चौहान यांनी केलेल्या Tweet मुळे महाराष्ट्रातही याविषयी चर्चा सुरू आहे. 'शिवरायांना आदर्श मानणारं ठाकरे सरकार काँग्रेसला बरोबर घेऊन सत्तेत आहे. त्यांना शिवाजी महाराजांचा असा अपमान सहन कसा होतो', असा बोचला सवाल शिवराज सिंह यांनी केला आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आहे. राज्य सरकारने या प्रकाराची दखल घ्यावी, अशीही मागणी होत आहे.शिवराज सिंह यांनी तर कमलनाथ यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. युवा कार्यकर्त्यांच्या मते, या चौकात चौथऱ्यावर पुतळा उभारण्यासाठी नगरपालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता. पण त्यांच्या पत्रव्यवहाराला दाद देण्यात आली नाही. गेले चार दिवस या चौकात चौथरा उभारणीचं काम सुरू होतं. त्यावेळी नगरपालिकेनं आक्षेप घेतला. हा पुतळा वाहतुकीस अडथळा करेल या कारणाने बुल्डोजर आणून तो उद्ध्वस्त करण्यात आला.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या