नवी दिल्ली, 24 एप्रिल : इंटरनेटच्या या जगात सायबर गुन्हेगार अनेक लोकांना आपले लक्ष्य करतात. मात्र, आता त्यांची हिंमत इतकी झाली आहे की ते थेट उपराष्ट्रपतींच्या
(Vice President of India) नावाचा वापर करुन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वत:ला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
(Venkaiah Naidu) असे सांगून एक व्यक्ती देशातील व्हीआयपींसोबत अनेक जणांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत आहे आणि आर्थिक मदतीची मागणी करत आहे. उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाने याबाबत शनिवारी ही माहिती दिली.
उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाने अधिकृत निवेदनात लोकांना सावध केले आहे की, ही व्यक्ती 9439073183 या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅप संदेश पाठवत आहे. तसेच याप्रकारचे बनावट संदेश आणखी इतरही क्रमांकावरुन येऊ शकतात, अशी शक्यता असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. या व्यक्तीने अनेक व्हीआयपी लोकांना अशाप्रकारे उपराष्ट्रपींच्या नावाने मेसेज पाठवून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. ही बाब उपराष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उपराष्ट्रपती सचिवालयाने गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे.
75 कोटींंची फसवणूक -
याआधी बंगळरु येथील सुकेश चंद्रशेखर यांने अनेक मोठ्या शहरातील श्रीमंत लोकांना फसवले होते. चंद्रशेखरला बालाजीच्या नावानेही ओळखले जाते. त्याने नोकरी देण्याच्या नावावर अनेक लोकांची फसवणूक केली. स्वत:ला राजनेत्याचा नातेवाईक सांगून त्याने 100 हून अधिक लोकांपासून 75 कोटी रुपये उकळले होते.
मुंबईत सायबर क्राईमची आणखी एक घटना -
नुकतेच मुंबईत मालाड येथे राहणाऱ्या 71 वर्षीय वृद्धाला मागच्या सोमवारी दुपारच्या सुमारास एक फोन आला. त्यात असेल म्हटले गेले की, मी दिल्लीचा पोलीस आयुक्त बोलत आहे. तुमचा एक नग्न व्हिडिओ युट्यूबर अपलोड करण्यात आला आहे. जर तो हटवण्यात आला नाही तर तुम्हाला अटक करण्यात येईल. यानंतर या वृद्धाला राहुल शर्मा नावाच्या एका व्यक्तिसोबत संपर्क साधायला लावला. तसेच तो त्याला व्हिडिओ हटवायला आणि ई-मेल कंफर्म करण्यास मदत करेल, असे सांगण्यात आले. यानंतर त्या व्यक्तीने व्हिडिओ काढायच्या नावावर या वृद्धाकडून 1.4 लाख रुपये उकळले. यानंतर या वृद्धाला लक्षात आले की, ते सायबर क्राईमचे शिकार झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.