छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवल्याने नागरिकांचा रास्ता रोको

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवल्याने नागरिकांचा रास्ता रोको

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रशासनाने रातोरात हटवल्याने नागरिक संतापले आणि त्यांनी मोठा महामार्ग रोखून धरला.

  • Share this:

छिंदवाडा, 11 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रशासनाने रातोरात हटवल्याने नागरिक संतापले आणि त्यांनी मोठा महामार्ग रोखून धरला. मध्य प्रदेशात हा प्रकार घडला. नागपूर- छिंदवाडा महामार्गावर नागरिकांनी या कारवाईविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं. मध्य प्रदेशातल्या एका नगरपालिकेनं परवानगीशिवाय उभ्या केलेल्या पुतळ्यावर बुल्डोजर चालवला.

मध्य प्रदेशात सौंसर नगरपालिकेनं ही पुतळा हटवण्याची कारवाई केली. सौंसर शहरातल्या एका चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्यासाठी शहरातल्या एका युवा संघटनेनं शिवाजी महाराजांचा पुतळाही तयार केला होता. चौकात मध्यभागी एक दगडी चौथरा उभारून त्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. महाराजांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी होता. या चौथऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, असं कारण देत नगरपालिकेनं या पुतळ्याला परवानगी नाकारली. दिवसा कारवाई केली तर  लोकांचा रोष होईल. हे लक्षात घेत नगरपालिकेनं रातोरात हा पुतळा पाडण्याचा निर्णय घेतला. बुल्डोझर मागवून रात्रीच चौथरा उद्ध्वस्त करण्याची कारवाई करण्यात आली. लोकांना हे लक्षात येताच ते रस्त्यावर उतरले. छिंदवाडा -नागपूर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. हा पुतळा पुन्हा तिथेच उभा करावा आणि लवकरात लवकर हे काम करावं अशी मागणी करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आहे. राज्य सरकारने या प्रकाराची दखल घ्यावी, अशीही मागणी होत आहे.

युवा कार्यकर्त्यांच्या मते, या चौकात चौथऱ्यावर पुतळा उभारण्यासाठी नगरपालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता. पण त्यांच्या पत्रव्यवहाराला दाद देण्यात आली नाही. गेले चार दिवस या चौकात चौथरा उभारणीचं काम सुरू होतं. त्यावेळी नगरपालिकेनं आक्षेप घेतला. हा पुतळा वाहतुकीस अडथळा करेल या कारणाने बुल्डोजर आणून तो उद्ध्वस्त करण्यात आला.

-------------------------------------------------

अन्य बातम्या

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजप युती तुटली, मनसेलाही बसला फटका!

Fact check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोनाव्हायरस होतो का?

भाजपने दिल्ली गमावली...पण मोदींनी सभा घेतलेल्या 2 जागांवर कोण जिंकलं?

First published: February 11, 2020, 7:02 PM IST

ताज्या बातम्या