नवी दिल्ली, 28 मे : महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये बदल होण्याची चिन्ह आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मदतीवरूनही भाजपने महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या राजकीय घडामोडीत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे मंगळवारी नवी दिल्लीत दाखल झाले.
गेल्या दोन दिवसांपासून नाना पटोले हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर आज त्यांची राहुल गांधी यांच्यासोबत बैठक होणार आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पटोले यांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची जबादारी दिली जाऊ शकते. सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे.
हेही वाचा -Lockdown 5.0 ची तयारी की EXIT plan? प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू
बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषद निवडणुकीत दोन उमेदवार देण्याची भूमिका घेतली होती. दिल्ली हायकमांडकडून एक उमेदवार जाहीर झाला होता. तर बाळासाहेब थोरात यांनी आणखी एका उमेदवारीची घोषणा केली होती. त्यामुळे काही काळ महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी दुसरा उमेदवारी मागे घेऊन वादावर पडदा टाकला होता.
महाराष्ट्रात मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत - राहुल गांधी
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या भूमिकेबद्दल परखड मत व्यक्त केलं होतं. 'महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आहे, मात्र आम्हाला मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन
त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी 27 मे रोजी राहुल गांधी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती. या चर्चेत राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा झाली. तसंच, राज्यातील राजकीय घडामोडींवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय.
राज्यात अधिवेशन घ्यावे लागेल - नाना पटोले
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील विधानसभा अधिवेशन येत्या 22 जूनपासून सुरू होणार आहे, अशी माहिती दिली आहे. सामाजिक अंतर आणि कोरोना परिस्थितीत सभागृह कसे चालवायचे याबद्दल लोकसभा अध्यक्षांशी चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विधानसभेचे अधिवेशन बोलण्याबाबतही विचार केला जात आहे. आरोग्य तयारीसाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खर्चाची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारला परवानगी घेण्यासाठी अधिवेशन घ्यावे लागेल. त्यामुळे विधानसभा अधिवेशन बोलणे आवश्यक आहे, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं होतं.
हेही वाचा - नगरसेविका पुत्रासह 12 प्रतिष्ठीतांना रंगेहात पकडलं, करत होते बेकायदा कृत्य
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Rahul gandhi