Load More
श्रीहरीकोटा 15 जुलै : सर्व देशाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-2 मोहिमेचं आजचं प्रक्षेपण रद्द करण्यात आलंय. प्रक्षेपणाला 56 मिनिटं आणि 24 सेकंद राहिले असताना काउंटडाऊन रोखण्यात आलं. काही तांत्रिक कारणांमुळे इस्रोने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. पहाटे 2 वाजून 51 मिनिटांची चांद्रयानाचं उड्डाण होणार होतं. मात्र क्रायोजिनिक इंजिनमध्ये इंधन भरताना काही तांत्रिक दोष आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने प्रक्षेपण रोखण्यात आल्याचं इस्रोने म्हटलं आहे. GSLV Mk-3 या बाहुबली प्रक्षेपकाच्या साह्याने 'चांद्रयान 2' आकाशात झेपावणार होतं. त्यासाठी इस्रोची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र क्रायोजिनिक इंजनच्या यंत्रणेत काही दोष आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. जेवढं इंधन भरण्यात आलं होतं ते खाली केल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता इस्रोने व्यक्त केलीय. मार्च महिन्यात भारताने अंतराळातील लाईव्ह उपग्रह पाडला होता. मिशन शक्तीच्या या यशानंतर भारत जगभरातील मोजक्या देशांच्या पंक्तीत विराजमान झाला होता. अंतराळात कार्यरत असलेला उपग्रह पाडण्याची क्षमता केवळ अमेरिका, रशिया आणि चीन यांच्याकडेच होती. चांद्रयान-2 च्या यशानंतर अशी मोहिम राबविणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला असता. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान आकाशात झेपावणार होतं.
