नवी दिल्ली, 15 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान देण्यासाठी मी वाराणसीमधूनच त्यांच्याविरुद्ध लढणार आहे, असं भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी News 18 ला सांगितलं आहे. यासाठी अखिलेश यांचा समाजवादी पक्ष आणि मायावतींच्या बसपाने मला साथ द्यावी, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
मी पश्चिम उत्तर प्रदेशमधून कोणत्याही सुरक्षित मतदारसंघातून लढलो असतो पण वाराणसीतून लढल्याशिवाय मोदींशी थेट सामना करता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
मोदी सरकार देशाच्या राज्यघटनेशी खेळ करतंय पण मी त्यांना एका पानाचीही घटना बदलू देणार नाही, असा आरोप त्यांनी केला. वाराणसीच्या एका जागेसाठी तरी सपा आणि बसपाने मला पाठिंबा द्यावा, असं ते म्हणाले.
प्रियांका गांधी यांनी दोनच दिवसांपूर्वी त्यांची भेट घेतली होती पण त्या माझ्या तब्येतीची विचारपूस करायला आल्या होत्या, असं सांगत या देशात कुणी दलित व्यक्तीला भेटायलाही जाऊ शकत नाही का ? असा सवाल चंद्रशेखर यांनी केला.
भीमा कोरेगावमध्ये माझ्या भाषणामुळे हिंसा भडकली नव्हती, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. इथे 1808 पासून संघर्ष होत आलाय, असं विधानही त्यांनी केलं.
कोण आहेत चंद्रशेखर आझाद ?
चंद्रशेखर आझाद हे पश्चिम उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधले आहेत.धडकुली या त्यांच्या खेडेगावाबाहेर त्यांनी एक बोर्ड लावला. 'धडकुलीचे द ग्रेट चामार तुमचं स्वागत करत आहेत', असा तो बोर्ड होता. या फलकामुळे ते चर्चेत आले.उत्तर प्रदेशमधल्या ठाकुर समाजाकडून दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आहे.
त्यांनी विनय रतन सिंग या सहकाऱ्यासोबत 2014 मध्ये भीम आर्मीची स्थापना केली. शिक्षणाच्या मार्फत दलित समाजातल्या लोकांचा उद्धार हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. भीम आर्मीमार्फत त्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 350 मोफत शाळाही काढल्या आहेत.
सहारनपूरमधल्या हिंसाचार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. पण त्यानंतर अनेक वेळा त्यांना अटक करण्यात आली आहे.