S M L

गुजरातचा रणसंग्राम आणि नूतन 'पक्षाध्यक्ष' राहुल गांधींसमोरची 'आव्हानं'

काँग्रेसचे 'युवराज' राहुल गांधी यांची अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालीय. पण त्यांच्यासाठी ही नवीन जबाबदारी नक्कीच वाटते तेवढी सोपी नाहीये, काय आहेत त्यांच्यासमोरची खडतर आव्हानं ? यावरच 'न्यूज18 लोकमत'चे 'डेप्युटी न्यूज एडिटर' चंद्रकांत फुंदे यांनी लिहिलेला हा विशेष 'ब्लॉग...'

Chandrakant Funde | Updated On: Dec 11, 2017 11:42 PM IST

गुजरातचा रणसंग्राम आणि नूतन 'पक्षाध्यक्ष' राहुल गांधींसमोरची 'आव्हानं'

चंद्रकांत फुंदे, डेप्युटी न्यूज एडिटर, न्यूज18 लोकमत

'राहुल गांधी गांभीर्याने राजकारण करतात, पण त्यात सातत्य नाही. मेहनत घेतात, पण एकंदरीत अनुभव बेभरवशाचा आहे. चेहरा राजकारण्याचा आहे, पण पिंड 'झोलीवाले बाबा'चा. राजकीय मूल्ये पक्की आहेत, पण वृत्ती धोरण धरसोडपणाचे आहे. राजकीय आवाका आहे, पण खोली मात्र तेवढी नाही. राजकीयदृष्ट्या लवचिक आहेत, पण मुत्सद्दीपणात मार खातात...' आमच्या पत्रकार मित्राने राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचं अत्यंत मोजक्या शब्दात केलेलं हे वर्णन त्यांना आजही अत्यंत चपखल बसतं... तर सांगायचा मुद्दा असा की, काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे आता 132 वर्षांच्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्षपदी विराजमान झालेत. ऐन गुजरात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता पार पडली. औपचारिकता अशासाठी की, त्यांची निवडही बिनविरोध झालीय. किंबहुना ती केली गेलीय हे इथं वेगळं सांगायला नको... या पदासाठी लागणारं सर्वात मोठं क्वॉलिफिकेशन म्हणजे त्यांचं आडनाव गांधी आहे ! अर्थात काँग्रेस पक्षदेखील गांधी घराण्याच्या राजकीय वारसाशिवाय व्यवस्थित चालूच शकत नाही, हे वास्तवही किमान काँग्रेसवाल्यांनी तरी नक्कीच स्वीकारलेलं आहे. विरोधक मात्र त्याला घराणेशाहीचं बिरुद लावून मोकळे होतात.पंतप्रधान मोदींनी तर राहुल गांधींच्या पक्षाध्यक्ष निवडीला थेट औरंगजेबाचीच उपमा दिलीय. अर्थात त्याला कारण तसंच आहे. गुजरातमध्ये राहुल गांधींनी मोदींच्या 'विकास'ला वेडा ठरवून भाजपविरोधात चांगलंच रान पेटवलंय. कदाचित म्हणूनच आपल्या 'बहुराष्ट्रीय' पंतप्रधानांना अमिताभजींनी जाहिरातीत केलेल्या आवाहनापेक्षा कितीतरी जास्तवेळ गुजरातमध्ये काढावा लागतोय. 'कुछ दिन तो गुजारो गुजरात में' ही अमिताभ बच्चन यांची गुजरात टुरिझमची जाहिरात आता आठवण्याचं कारण एवढंच की आता गुजरातच्या निवडणुका आहेत आणि त्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तब्बल 50 प्रचारसभा घेताहेत. खरं तर भाजपच्या सोशल आर्मी 'पप्पू' ठरवलेल्या राहुल गांधींना हरवण्यासाठी आपल्या पंतप्रधानांना एवढ्या प्रचारसभा घेण्याची काहीच गरज नव्हती, पण 22 वर्षांची 'अँटीइनक्बन्सी' आणि 'गुजराती नेटिझन्स'नी वेडा ठरवलेला 'विकास' भाजपसाठी चांगलीच डोकेदुखी ठरलाय. तर आजपर्यंत काँग्रेसवाल्यांसाठी डोकेदुखी ठरलेले राहुल गांधी भलतेच फॉर्मात आलेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारसभांना चांगली गर्दीही जमतेय. लोकदेखील त्यांना सीरियसली ऐकू लागलेत. गुजरात निवडणुकीच्या प्रथमच राहुल गांधी यांची भाजपने रंगवलेली 'पप्पू' ही इमेज पुसली जात असून लोकही त्यांच्याकडे एक आश्वासक चेहरा म्हणून बघू लागलेत.

राहुल गांधी यांच्यातला निखळ राजकारणी आता कुठे लोकांना आपलासा वाटू लागलाय. म्हणूनच मॅडम सोनिया गांधींनी देखील 'अभी नहीं तो कभी नहीं' या म्हणीप्रमाणे लागलीच त्यांचा राज्याभिषेक उरकून घेण्याचा दृढनिश्चय केला. सुदैवाने त्यांच्या विरोधात कोणीच अर्ज न भरल्याने राहुल गांधी एकदाचे काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झालेत. पण त्यांची राजकीय नक्कीच वाटते तितकी सोपी नसणार आहे. कारण त्यांच्या नावावर एकाही विजयी निवडणुकीची नोंद नाही. याउलट 2014ची लोकसभा, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड अशा सगळ्याच मोठ्या निवडणुकांचं अपयश राहुल गांधींच्याच नावावर आहे. तरीही गुजरातमध्ये राहुल गांधी नव्या जोमाने कामाला लागलेत हीच काँग्रेससाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे. कारण सोनिया गांधींचं आजारपण कमी होत नसल्याने आज ना उद्या राहुल गांधींना काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावीच लागणार होती. पण स्वतः राहुल गांधीच पक्षाची संपूर्ण जबाबदारी घ्यायला आजवर टाळाटाळ करताना दिसत होते. पण सरतेशेवटी त्यांनी ती स्वीकारलीच, किंबहुना त्यांच्यासमोरही दुसरा पर्याय नव्हताच. कारण पराभूत मानसिकतेतून आज ना उद्या त्यांना बाहेर यावं लागणारच होतं. आणि आता ते आलेत देखील, असंच म्हणावं लागेल. गुजरात निवडणुकीतील राहुल गांधींची देहबोली, भाषणांमधली आक्रमकता आणि विचारपूर्वक आखलेली प्रचाराची रणनीती काँग्रेसजनांना तरी नक्कीच आश्वासक वाटतेय. गुजरात निवडणुकीच्या निकालाबाबत आताच अंदाज व्यक्त करणं कठीण आहे. पण यावेळी त्यांनी प्रथमच पंतप्रधान मोदींना नक्कीच जोरदार टक्कर दिलीय, हे मात्र मान्यच करावं लागेल.

Loading...
Loading...

गुजरात ही खरं तर भाजपसाठी आतापर्यंतची हिंदुत्वासाठीची एक हक्काची प्रयोगशाळा म्हणावी लागेल. पण राहुल गांधी प्रथमच हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी या तीन भाजप सरकारविरोधी युवा चेहऱ्यांना एकत्र घेऊन मोदी-शहा जोडगोळीसमोर तगडं आव्हान उभं केलंय. कदाचित त्यामुळेच प्रथमच गुजरातची निवडणूक धार्मिक मुद्यांऐवजी जातीय राजकारणांवर लढवली जातेय. यासोबतच तिथली राजकीय गरज लक्षात घेऊन राहुल गांधींनी गुजरातमधल्या हिंदू मंदिरांनाही भेटी देण्याचा एकच सपाटा लावून 'सॉप्ट हिंदुत्वा'चीही कास धरलीय. पण भाजपवाल्यांनी राहुल गांधींचा धर्म कोणता? असा सवाल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण राहुल गांधी त्यालाही डगमगले नाहीत. पण अशातच काँग्रेसचे वाचाळवीर मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांविरोधात नको ते 'नीच' वक्तव्य करून मोदींच्या 'गुजराती अस्मितेला' अप्रत्यक्षपणे हवा देण्याची मोठी घोडचूक केली. पण राहुल गांधींनी तात्काळ 'डॅमेज कंट्रोल' करत अय्यर यांची थेट पक्षातूनच हकालपट्टी केली आणि आपणही आता राजकीय खेळांमध्ये एकदमच 'पप्पू' राहिलो नसल्याचं दाखवून दिलं. म्हणून मग 'मुरब्बी' मोदींनी गुजरातच्या निवडणूक प्रचारात थेट पाकिस्तानालाच ओढलं ! ही निवडणूक पुन्हा धार्मिक राजकारणाच्या वळणावर जावी, हाच त्यामागचा प्रयत्न ! थोडक्यात काय तर राहुल गांधी ही निवडणूक विकास आणि जातीय राजकारणावर लढू पाहतायत. तर मोदी ही निवडणूक पुन्हा पुन्हा 'गुजराती अस्मिता' आणि राम मंदिराच्या 'धार्मिक' वळणावर नेऊ पाहतायत. असो...

या निवडणुकीचा निकाल काहीही लागो. पण या निवडणुकीत खरी प्रतिष्ठा पणाला लागलीय ती पंतप्रधान मोदींचीच ! कारण राहुल हरले तर फारफार तर त्यांच्या नावावर आणखी एका पराभवाची नोंद होईल पण मोदी हरले तर राष्ट्रीय राजकारणात मोदी-शहांची मोठी नाचक्की होईल. त्यांचे पक्षांतर्गत विरोधक पुन्हा उठून उभारतील, कदाचित त्यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. एवढंच नाहीतर देशाच्या राजकारणालाही एक नवी दिशा मिळेल. म्हणूनच गुजरातच्या निवडणुकीकडे 2019च्या लोकसभेची 'सेमीफायनल' म्हणून पाहिलं जातंय. समजा, या निवडणुकीत राहुल गांधी हरले तरीही या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची 'पप्पू' ही इमेज पुसली जाऊ लागलीय, हे रामोदी समर्थकही खासगीत मान्य करू लागलेत. आणि समजा या निवडणुकीत भाजप सत्तेत येऊनही त्यांच्या जागा कमी झाल्या आणि काँग्रेसच्या जागा गेल्या वेळेपेक्षा वाढल्या तर त्याचं श्रेयही अर्थातच राहुल गांधींच्या नेतृत्वाला जाईल आणि ते 2019च्या तयारीसाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील. असो हे झालं 'जर-तर'चं भाष्य ! पण राहुल गांधींसमोर यापुढे खरं आव्हान असणार आहे ते काँग्रेसला पुढे घेऊन जाण्याचं, पक्षकार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचं... कारण हा पक्षच मुळी काळाबरोबर बदललेला नाही. दरबारी राजकारणामुळे या पक्षाकडे आजमितीला एकही 'क्राऊडपुलर' लोकनेता नाही. आणि जे कोणी होते त्यांना एकतर पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला किंवा त्यांचं पक्षनेतृत्वाकडून खच्चीकरण केलं गेलं !

पक्षाची कधीकाळी हक्काची वोटबँक असलेले दलित, आदिवासी, मुस्लिम पक्षापासून दूर जाऊ लागलेत. ओबीसी हा सर्वात मोठा घटक तर केव्हाच भाजपने काँग्रेसपासून पळवून नेलाय, किंबहुना या 40 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या ओबीसी घटकाच्या जीवावरच भाजप आज सगळीकडे सत्ता खेचतेय. म्हणूनच काँग्रेसला पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर त्यांना ओबीसींना आपलंसं केल्याशिवाय पर्याय नाही. नाना पटोलेंसारख्या भाजप बंडखोर नेत्याला पक्षात घेऊन राहुल गांधींनी हा 'ओबीसी पॉलिटिक्स'चा प्रयोग करून पाहायला काहीच हरकत नाही. कारण गावोगावी आजही काँग्रेसची प्रस्थापित जुनी खोडं, राजकारणात येऊ पाहणाऱ्या ओबीसींना पक्षात पुढे येऊ देत नाही. याउलट भाजपने मात्र जाणीवपूर्वक ओबीसी नेत्यांना संधी देत ही एकगठ्ठा वोटबँक आपलीशी केलीय. पण सध्याच्या भाजप नेत्यांचा पिंडच मुळी धार्मिक राजकारणाचा असल्याने ते विकासाच्या आडून अनेकदा धर्माचं राजकारणही खेळताना दिसतायत. गुजरातमध्येही तेच होताना दिसतंय...

राहता राहिला प्रश्न राहुल गांधींच्या नेतृत्वाचा तर त्यांना कामात सातत्य हे ठेवावेच लागेल. पक्ष हरला की मधूनच सुट्टीवर निघून जाणे किंवा अज्ञातवासात जाणे हे काही परिपक्व राजकीय नेतृत्वाचं लक्षण नाही. तसंही राजकारण हा काही 'पार्टटाइम जॉब' नाही. त्यासाठी तुम्हाला इच्छा असो वा नसो, तुम्हाला 24 तास राजकारणच करावं लागतं. पक्षकार्यकर्त्यांना नवनवीन कार्यक्रम द्यावे लागतात. प्रसंगी राजकीय डावपेचही खेळावे लागतात. राजकारणात हळवं होऊन चालत नाही किंवा पराभवाने खचूनही जाता कामा नये, राजकारण करणं म्हणजे काही 'एनजीओ' चालवणं नव्हे. थोडक्यात काय तर राहुल गांधी नाही हो म्हणत एकदाचे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष झालेच आहेत तर त्यांना या सर्व गोष्टी आत्मसात कराव्याच लागतील. तर आणि तरच त्यांचा भारतीय राजकारणात निभाव लागेल, नाहीतर काँग्रेसमधलाच एका मोठा गट तयार आहेच, 'प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ म्हणायला !' पाहूयात पुढे काय होतंय. तूर्तास, राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदासाठी शुभेच्छा ! एवढ्यावरच थांबूयात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 11:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close