नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत सोमवारी उपोषण केलं. हे उपोषण सरकारी खर्चाने झालं अशी माहिती आता उघड झालीय. या उपोषणावर तब्बल 10 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आलेत.
या उपोषणाच्या तयारीसाठी अर्थ खात्याने आदेश काढून खर्चाचा मंजूरी दिली होती. श्रीकाकूलम आणि अनंतरपूर येथून 20 डब्ब्यांच्य खास दोन ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. तर दिल्लीत अकराशे रूम्स बुक करण्यात आल्या होत्या. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागतासाठीही वारेमाप खर्च करण्यात आल्याचंही स्पष्ट झालंय.
सोमवारी सकाळपासून चंद्राबाबू आंध्र भवनमध्ये उपोषणाला बसले होते. लखनऊला जायच्या आधी राहुल गांधी यांनी चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. फारुख अब्दुल्ला, शरद पवार, अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनीही चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलाय. ममता बॅनर्जी तर खास कोलकत्याहून नवी दिल्लीत येणार आहेत.
रविवारी नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातल्या गुंटूर इथं सभा घेऊन चंद्राबाबूंवर टीका केली होती. चंद्रबाबू हे राज्यांच्या नाही तर आपला मुलगा लोकेशच्या भल्यासाठी काम करत असल्याची टीका त्यांनी केली होती. तर चंद्राबाबू यांनी पंतप्रधानांना धमकी देत मुलावर टीका करण्याचं बंद करा नाही तर तुमच्या पत्नीचा उल्लेख प्रचारात करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
त्यामुळे प्रचार वयक्तिक पातळीवर गेल्याचा आरोपही होतोय. राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुनच चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडले होते. तर असा दर्जा देणं घटनात्मदृष्ट्या शक्य नाही असं केंद्र सरकारचा युक्तिवाद आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हा सामना आणखी रंगण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra Pradesh CM, N Chandrababu Naidu, Narendra modi, NDA, आंध्र प्रदेश, चंद्राबाबू नायडू, नरेंद्र मोदी