मराठी बातम्या /बातम्या /देश /

पतीच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लावणं ही पत्नीची क्रूरताच; हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

पतीच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लावणं ही पत्नीची क्रूरताच; हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

हायकोर्टाने सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सांगितले की, या प्रकरणात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, पत्नीने पतीला अत्यंत वाईट वागणूक दिली. पती आणि सासरच्यांविरोधात वारंवार गुन्हे दाखल केल्याने पतीला तुरुंगात जावे लागले. त्यामुळे समाजासमोर पती आणि कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुढे वाचा ...

चंडीगड, 13 जुलै : लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींना कौटुंबिक हिंसाचाराच्या नावाखाली तक्रार करण्याची धमकी देणं, पतीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असं वर्तन वारंवार करणं हे क्रूरतेचं लक्षण आहे, अशी टिप्पणी करून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab & Chandigarh High Court) पंचकुला कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द करून पतीची घटस्फोटाची याचिका मंजूर केली. ‘अमर उजाला’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पंचकुला येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा 26 सप्टेंबर 2014 रोजी चंडीगड येथे थाटामाटात विवाह झाला होता. पतीने दाखल केलेल्या याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सर्व कुटुंबीय व पत्नीला घेऊन तो नैनादेवी येथे गेला होता. तेथे सर्वांसमोरच पत्नीने त्याच्या कानशिलात लगावली होती. यानंतर अनेकदा असंच घडलं. एकदा नोकरीच्या निमित्ताने तो दिल्ली येथे गेला असता पत्नीने तिथेही बराच गोंधळ घातला. वारंवार पतीला मेसेज पाठवून त्याला हैराण करून सोडलं होतं. पोलिसांकडे तक्रार देण्याची व आत्महत्या करण्याची धमकी ती सतत देत होती. पतीकडे काहीच पर्याय नसल्याने त्याने पत्नीपासून सुरक्षा मिळावी म्हणून स्थानिक पोलीस ठाण्यात मदतीची याचना केली. या प्रकरणानंतर पत्नी पंचकुला येथे सासरच्या घरी पोहोचली आणि तिथलं स्वतःचं सर्व सामान घेऊन माहेरी अंबाला येथे निघून गेली. याचिकाकर्त्या पतीच्या म्हणण्यानुसार, हा छळ येथेच थांबला नाही, तर माहेरी गेल्यानंतर पत्नीने पती व त्याच्या कुटुंबीयांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीही दिल्या. दरम्यान, पतीचे सर्व आरोप पत्नीने फेटाळून लावले आहेत.

गुगलवरुन बँक हेल्पलाईन नंबर घेणे महागात, माजी सैनिकाच्या खात्यातून तब्बल 20 लाख रुपये लंपास

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यात न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर या प्रकरणाचा निकाल दिला. न्यायालयात दाखल साक्षी-पुराव्यांवरून या प्रकरणात पत्नीने पतीचा छळ केल्याचे निष्पन्न झाल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पत्नीने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात वारंवार तक्रार दिल्याने पतीला तुरुंगवासही भोगावा लागला. त्यामुळे पतीच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचला, असंही न्यायालयाने म्हटलं. पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात पत्नीची वागणूक क्रूरता दर्शवणारी आहे, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच पंचकुला कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करून, पतीने दाखल केलेली घटस्फोटाची याचिका उच्च न्यायालयाने मंजूर केली.

First published:

Tags: Crime, Punjab