चंदिगड, 8 मार्च : हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रापाठोपाठ हरियाणातही विधानसभा बरखास्त केली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हरियाणात विधानसभा बरखास्त करण्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा आणि लोकसभा एकाच वेळी घेण्यात येतील असेही म्हटले जात आहे. यावेळी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची भेट घेतल्याने ही चर्चा आणखी वाढली आहे.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल सत्यदेव यांची बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेने हरियाणाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात 1 तास 40 मिनिटे चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीसह आता विधानसभेच्या निवडणुका देखील एकत्र होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे. लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत. त्या आपल्या नियोजित वेळीच होतील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या शक्यतांना विराम लागला आहे.
या आधी दोनही निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शुक्रवारी विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आणला जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवेंच्या वादाचं निमित्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं.