• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • D-MART चे CEO नविल नोरोन्हा आहेत देशातले सर्वांत श्रीमंत CEO; संपत्ती बघून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

D-MART चे CEO नविल नोरोन्हा आहेत देशातले सर्वांत श्रीमंत CEO; संपत्ती बघून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

ही संपत्ती केवळ त्यांच्याकडे असलेल्या डी-मार्ट चालवणाऱ्या अव्हेन्यू सुपरमार्केट्स लिमिटेडच्या शेअर्सची किंमत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : D- MART ही देशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी संघटित रिटेलर स्टोअर्सची साखळी चालवणाऱ्या (D-Mart) अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे (Avenue Supermarts Ltd) सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी नविल नोरोन्हा (Navil Noronha) हे देशातले सर्वांत श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापक (Wealthiest CEO In India) ठरले आहेत. 'मिंट'च्या वृत्तानुसार, त्यांच्याकडे अंदाजे 5146 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ही संपत्ती केवळ त्यांच्याकडे असलेल्या डी-मार्ट चालवणाऱ्या अव्हेन्यू सुपरमार्केट्स लिमिटेडच्या शेअर्सची किंमत आहे. त्यात त्यांना मिळणारं वेतन किंवा इतर उत्पन्नाचा समावेश नाही. अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या शेअरच्या (Share) किमतीत पाच पटींनी वाढ झाल्यामुळे नोरोन्हा यांच्या संपत्तीतही भरभक्कम वाढ झाली आहे. यामुळे नोरोन्हा यांच्या अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडमधल्या 2.03 टक्के हिश्श्याचं मूल्य झोमॅटोमधल्या गोयल यांच्याकडे असलेल्या हिश्श्याइतकं झालं आहे. गेल्या वर्षी अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या शेअरने सुमारे 116 टक्क्यांनी उसळी घेतली होती. गेल्या चार वर्षांत या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी (Radha kishan Damani) यांच्यासह गुंतवणूकदार आणि भागधारकही यांनाही याचा चांगला फायदा मिळाला आहे. कंपनीच्या या प्रगतीत नोरोन्हा यांचा मोलाचा वाटा आहे. 2004 साली डी-मार्टमध्ये बिझनेस हेड (Business Head) म्हणून रुजू झाल्यापासून नोरोन्हा यांनी अनेक उल्लेखनीय सुधारणा केल्या. 48 तासांत पुरवठादारांना पेमेंट करण्याची पॉलिसी (Payment Policy) त्यांनीच दाखल केली. डी-मार्टला माल पुरवणाऱ्या सर्व पुरवठादारांना डिलिव्हरी मिळाल्यापासून 48 तासांच्या आत पैसे दिले जातात. त्यामुळे डी-मार्टवर पुरवठादारांचा विश्वास वाढला. ते डी-मार्टला 2 ते 3 टक्के मार्जिन देऊ लागले. परिणामी पुरवठा साखळी सुरळीत आणि गतिमान झाली. यासह अनेक नवनवीन संकल्पना राबवून नोरोन्हा यांनी डी-मार्टच्या व्यवसायात लक्षणीय वाढ करून दाखवली. कंपनीच्या प्रगतीची झलक तिचा नफा आणि शेअर्समध्ये होणाऱ्या वाढीतून सहज दिसून येते. हे वाचा - क्या बात है! MS धोनीवर भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून आणखी एक मोठी जबाबदारी मुंबईतल्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून व्यवस्थापनाची पदवी घेतलेले नोरोन्हा अखंडपणे कामात मग्न असतात. व्यवसायाला वाहून घेतलेले व्यवस्थापक अशीच त्यांची ख्याती आहे. कंपनीचा आयपीओ आल्यापासून त्यांनी फक्त एक दिवस सुट्टी घेतली आहे. जीक्यू इंडियानं दिलेल्या महितीनुसार, नोरोन्हा यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी (Daughter’s Birthday) फक्त एकदा सुट्टी (One Day Leave) घेतली होती. विनम्रता आणि साधी राहणी ही त्यांची वैशिष्ट्यं आहेत. नोरोन्हा यांचं कार्यालयदेखील लहान आणि साधं आहे. सामान्यतः कोणत्याही कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं ऑफिस जितकं मोठं असतं, त्याच्या केवळ एक चतुर्थांश आकाराचं त्यांचं ऑफिस आहे. डी-मार्टमध्ये येण्यापूर्वी ते एफएमसीजी अर्थात फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) क्षेत्रातली दिग्गज कंपनी असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये (Hindustan Unilever) बाजारपेठ संशोधक आणि आधुनिक व्यापार या क्षेत्रात विक्री अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा अनुभव आणि कामाची व्याप्ती हेरून डी-मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी त्यांना डी-मार्टमध्ये व्यवसाय प्रमुखपदाची ऑफर दिली. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या 18 महिन्यांपासून कंपनीलाही व्यवसायातल्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. स्टोअरमध्ये येणाऱ्या ग्राहकांचं प्रमाण कमी झाल्याने कंपनीच्या उत्पन्नावर लक्षणीय परिणाम झाला आहे. या काळात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढल्यानं कंपनीनंही हा बदल स्वीकारून अनेक किरकोळ विक्रेत्यांना ऑनलाइन डोमेनवर आणलं आहे. त्यामुळे माल पुरवठा सुरू राहील आणि छोट्या व्यावसायिकांनाही फायदा होईल. नोरोन्हा यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांमध्ये कंपनीनं आपल्या यशाचा आलेख चढता ठेवण्यात यश मिळवलं आहे. टाटा टेस्कोच्या मालकीचे स्टार, आदित्य बिर्ला रिटेल, स्पेन्सर आदी स्पर्धकांच्या तुलनेत डी-मार्ट ही एकमेव नफा कमावणारी रिटेल स्टोअर साखळी ठरली आहे. हे वाचा - जश्न! मोदींच्या वाढदिवसानिमित्त 20 दिवस जंगी सोहळा, 71 हजार दिवे आणि बरंच काही.. इतकी प्रचंड संपत्ती असूनही नोरोन्हा यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांची नोकरी, त्यांचं काम हीच त्यांची आवड आहे. कामावरची निष्ठा, सातत्य आणि विनम्रता हीच त्यांच्या यशातली महत्त्वाची साधनं आहेत. या गुणांच्या बळावर आपण सर्वोच्च यश प्राप्त करू शकतो हे नविल नोरोन्हा यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांची ही यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
  First published: