नवी दिल्ली, 17 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं (Corona Virus) अक्षरशः थैमान घातलं आहे. देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तर दिवसाला चार हजाराहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतं आहे. कोरोना विषाणूच्या धोक्याची किंवा दुसऱ्या लाटेची पूर्वकल्पना केंद्र सरकारला देण्यात आली होती. पण सरकारची कोरोना साथ हाताळण्याची पद्धतचं चुकीची असल्याचा आरोप करत प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील (Virologist shahid jameel) यांनी सल्लागार शास्त्रज्ञांच्या फोरममधून (INSACOG) राजीनामा (resign from Advisory Committee) दिला आहे.
संबंधित फोरम कोरोना विषाणूच्या विविध व्हेरिएंट्सचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आली होती. या फोरममध्ये देशातील प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आला होता. कोरोना साथीच्या लढ्यात केंद्र सरकारच्या नियोजनावर आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर जमील मागील काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित करत होते. पण सरकारकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यानं विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार समितीतून राजीनामा दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.
वैज्ञानिकांची ही फोरम जैव प्रौद्योगिक विभागाच्या अंतर्गत येते. या मंत्रालयाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी अजूनतरी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या विविध बातम्यांनुसार, या फोरमनं केंद्राला अगोदरच पूर्वकल्पना दिली होती की, मार्च महिन्यात कोरोना विषाणूची नवीन लाट येईल. यामुळे मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढेल. परिणामी कोरोना संसर्गाचा वेग वाढून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येईल. पण केंद्र सरकारनं सल्लागारांच्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे गाफिल राहिलेल्या देशाला मार्चपासून कोरोना विषाणूचा तीव्र फटका बसला आहे.
हे ही वाचा-ऑक्सिजन तुटवड्याचं संकट होणार कमी; DRDO आज लॉन्च करणार 2-डीजी अँटी कोविड औषध
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं अक्षरशः थैमान घातलं आहे. तसेच देशात वैद्यकीय सामग्रीचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विरोध पक्षासह सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धीजीवी लोकं केंद्रसरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पण यानंतर आता पहिल्यांदाच केंद्राला सल्ला देणाऱ्या विषाणू शास्त्रज्ञांच्या फोरममधील एखाद्या शास्त्रज्ञानं वेगळं मत मांडलं आहे. फोरमकडून योग्य सल्ला दिला असतानाही सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं, असल्याचं मतही विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी मांडलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Delhi, Resignation, Scientist