स्मशानातही पाहिली जातीये जात, गावातील अजब प्रकाराची होणार चौकशी

स्मशानातही पाहिली जातीये जात, गावातील अजब प्रकाराची होणार चौकशी

एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जातात. मात्र, निधनानंतरही व्यक्तीच्या जातीवरुन भेदभाव करणारं गाव आधुनिक भारतात आजही आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : भारताचं संविधान सर्वांना समान अधिकार देत असलं तरीही आजही अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं जातीवरुन भेदभाव केला जातो. अनेकदा याचा पुरावा देणारे फोटोही समोर येत असतात. हे फोटो नकळतपणे हे दाखवून देतात, की आजही भारतात दोन प्रकारचे देश वसतात. असाच एक प्रकार आता बुलंदशहरातील (Bulandshahar) पहासून ब्लॉकमधील बनैल गावातून समोर आला आहे. इथं चक्क स्मशाभूमीच (Crematorium)जातीच्या आधारावर दोन भागात वाटून घेण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावात 2017 मध्ये स्मशाभूमी बनवली गेली. यानंतर काही काळातच याला दोन भागात वाटलं गेलं. हे गाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया यांचं वडिलोपार्जित गाव म्हणून प्रसिद्ध आहे.पहासूच्या बनैल गावात स्मशानाची दोन भागात वाटणी करण्यासाठी तारांचा उपयोग केला गेला आहे. या तारा पाहून ही दोन देशांची सीमा असल्याचा भास होतो. या तारेच्या एका बाजूला उच्च जातीच्या लोकांचे अंत्यसंस्कार केले जातात. तर, दुसऱ्या बाजूला दलितांवर अंत्यसंस्कार केले जातात. म्हणजेच या स्मशानात जात पाहूनच अंत्यसंस्कार केले जातात. हे सगळं पाहून असा प्रश्न निर्माण होतो, की संविधान सर्वांना समान हक्क देतं. कायदाही सर्वांना समान हक्क देतो. मग हे कोण लोक आहेत, जे समाजातील या घटकांसोबत भेदभाव करतात.

गावात राहाणारे सचिन राघव आणि गौरव चौहान म्हणाले, की जातीमधील भेदभावामुळं स्मशानात अशा प्रकारे ताराबंदी करणं चुकीचं आहे. मात्र, जेव्हा इथे ताराबंदी केली गेली, तेव्हा कोणीच याचा विरोध केला नसावा. जर विरोध केला असता तर बुलंदशहरातील या गावाच्या स्मशानभूमीचे असे फोटो व्हायरल झाले नसते.

प्रकरणाची चौकशी करून होणार कारवाई -

याप्रकरणी पहासूचे बीडीओ घनश्याम वर्मा म्हणाले, की हे प्रकरण आता त्यांच्याकडे आलं असून याची चौकशी करून ते योग्य ती कारवाई करतील. मात्र, पुन्हा गंभीर बाब ही आहे, की तिथली ताराबंदी प्रशासन काढून टाकू शकतं. मात्र, लोकांच्या मनामध्ये रुजलेला हा भेदभाव काढून टाकणं अत्यंक कठीण आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 19, 2021, 12:31 PM IST

ताज्या बातम्या